दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : लाडक्या गणरायाला निरोप देण्याची लगबग सुरू झाली असताना इचलकरंजी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनीही निवडणुकीचा मंडप काबीज करण्याची हालचाली सुरू केल्या आहेत. या वेळी मुख्यमंत्री शिंदे समर्थक, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे स्वागत कक्ष वाढले आहेत. तर राष्ट्रवादीच्या मनोमिलनाचे पहिले पाऊलही या निमित्ताने पडले आहे.

इचलकरंजीत गणेश विसर्जनाची मिरवणूक दरवर्षी उत्साहाने निघत असते. यंदा तर निर्बंधमुक्त असल्याने उत्साहाला उधाण आले आहे. वस्त्र नगरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्य मार्गावर असलेल्या असलेले स्वागत कक्ष. यामध्ये दरवर्षी भर पडत असते. यंदा तर काही महिन्यांवर महापालिकेची पहिली निवडणूक येणार असल्याने स्वागत कक्षाच्या निमित्ताने निवडणुकीचा फड जिंकण्याचे मनसुबे आखले आहेत.

हेही वाचा… मुख्यमंत्री शिंदे यांच्या गणेश दर्शन मोहिमेमुळे सर्वपक्षीय नेत्यांचे गणेश मंडळांचे भक्ती पर्यटन

शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्ध पुतळा येथे स्वागत कक्ष उभारला आहे. जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही जुन्या नगरपालिकेजवळ मंडप उभारलेला आहे. खेरीज काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे तसेच आमदार प्रकाश आवाडे अध्यक्ष असलेले इचलकरंजी फेस्टिवल यांचेही मंडप आहेत. माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन व यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांच्या साईप्रसाद सेवा मंडळाचाही मंडप आहे. क्रेडाई, मुस्लीम समाज, मारवाडी समाज, राष्ट्रगीत यांचेही कक्ष आहेत.

हेही वाचा… Ganesh Chaturthi 2022 : अनंत चतुर्दशीला का केले जाते गणपती बाप्पाचे विसर्जन? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि यावर्षीचा शुभ मुहूर्त

राष्ट्रवादीचे मनोमिलन

राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी आमदार जांभळे व प्रदेश सदस्य मदन कारंडे हे दोन्ही भिन्न दिशेला असलेले गट माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्र आणले आहेत. या मनोमिलनाचे पहिले पाऊल म्हणून यंदा कारंडे यांनी स्वागत कक्षाला विराम दिला असून नारायण चित्रमंदिर जवळील जांभळे यांच्या कक्षात हा गट उद्या थांबणार असल्याचे सांगण्यात आले. मनोमिलन घडवण्यात पुढाकार घेतलेले माजी आमदार राजीव आवळे यांनी मात्र राजीव आवळे युवा प्रतिष्ठान व माउली प्रतिष्ठान यांचा मंडप कायम ठेवला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ichalkaranji election agenda of all political parties in ganesh immersion procession print politics news asj
First published on: 09-09-2022 at 10:30 IST