शिवसेनेचे तगडे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होत असले तरी बंडखोरांनी आपला हिंदुत्वाचा नारा कायम ठेवल्याने ते शरीराने सेनेपासून दुरावले तरी भाजपच्या हिंदुत्वासोबतच जय महाराष्ट्राचाच नारा देत कार्यरत राहतील असा विश्वास बंडखोरांच्या समर्थकांना वाटतो आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडीने शिवसैनिक व्यथित असले तरी हिंदुत्वाचे सूत न जुळलेलेल्या राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस सत्तेतून दूर होत असल्याबाबत समाधानाचा सूरही दिसत आहे. परंतु, पक्षनेतृत्वाला नामोहरम करण्याची खेळी कडव्या शिवसैनिकाला रुचणारी नाही हेही तितकेच खरे. सत्ता वाटपावरून शिवसेनेने भाजपची युती मोडली असलीतरी पक्षनेतृत्व हिंदुत्वाची चीड असणार्‍या लोकांसमवेत गेल्याची नाराजी होतीच. अशातच सत्तेच्या कालावधीच्या मध्यांतरी पक्ष प्रचाराच्या कारणास्तव महाराष्ट्रभर जनसंपर्क यात्रा काढणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या स्थानिक आमदारांना लक्ष्य केल्याने आणि राष्ट्रवादीच्या सततच्या कुरघोड्यांमुळे शिवसैनिकांमध्ये खदखद होती.

शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई तसेच कोरेगावचे सेनेचे आमदार महेश शिंदे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांशी वरचेवर संघर्ष करावा लागत होता. तर, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी सेनेची वरिष्ठ मंडळी राष्ट्रवादीची आणि कॉँग्रेसची मर्जी संभाळण्याला प्राधान्य देत राहिल्याने खदखद वाढत राहिली. राष्ट्रवादी कॉँग्रेस सतत खच्चीकरण करत राहिल्याने मंत्री शंभुराज, आमदार महेश शिंदे नाराज होते. या परिस्थितीची सल शिवसैनिकांनाही होती. अशाच त्रासातून शंभुराज व महेश शिंदे बंडखोरीच्या पवित्र्यात उतरल्याचे आता दडून राहिले नाही. पण, त्यात थेट पक्षप्रमुखांना कमीपणा आल्याची वेदना कडव्या शिवसैनिकांमध्ये दिसते आहे