scorecardresearch

नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण .. वाद नको रे बुवा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानेच बहुधा राज्यपालांनी पुतळ्याचे अनावरण करण्याचे टाळले असावे, अशी चर्चा आहे.

Kavikulaguru Kalidas Sanskrit University, ramtek, inauguration, Narasimha rao, statue
नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण .. वाद नको रे बुवा ( Image Courtesy – Kavikulaguru Kalidas Sanskrit University, लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

संजीव कुळकर्णी

नांदेड : नागपूरजवळील रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या परिसरातील माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांना निमंत्रण देण्यात आले असले तरी त्यांनी होकार कळविला नाही. शेवटी सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांच्या हस्ते येत्या मंगळवारी (२0 डिसेंबर) अनावरण केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानेच बहुधा राज्यपालांनी पुतळ्याचे अनावरण करण्याचे टाळले असावे, अशी चर्चा आहे.

१९९१ ते ९६ दरम्यानच्या अत्यंत कठीण कालखंडात देशाचे पंतप्रधानपद भूषविणारे नरसिंह राव हे स्वातंत्र्योत्तर काळातील एक विद्वान आणि बहुआयामी नेते म्हणून परिचित होते. संस्कृत, मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. तत्कालीन आंध्रप्रदेश हे त्यांचे गृहराज्य; पण नागपूर जवळच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी १९८० च्या दशकात प्रतिनिधित्व केले. त्याआधीच्या काळात त्यांनी नागपूर विद्यापीठातून शिक्षणही घेतले होते. याच रामटेकमधील संस्कृत विद्यापीठाच्या परिसरात त्यांचा पुतळा उभारण्याची प्रक्रिया मागील वर्षापासून सुरू होती. विद्यापीठातील प्राधिकरणांनी त्यासंबंधीची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर राव यांचे पुत्र प्रभाकर राव यांच्याशी संबंधित प्रतिष्ठानने विद्यापीठाला माजी पंतप्रधानांचा पूर्णाकृती पुतळा उपलब्ध करून दिला आहे.

हेही वाचा… मुख्यमंत्र्यांची कन्या आणि भगिनीमुळे डोकेदुखी वाढली…

नरसिंहराव हे हैदराबादच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे सेनानी. स्वामी रामानंद तीर्थ यांचेे अनुयायी म्हणून ते ओळखले जात. या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये नरसिंहराव यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेत संस्कृत विद्यापीठाने चांगले औचित्य साधल्याबद्दल राव यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले होते. या पुतळ्याचे अनावरण सप्टेंबर महिन्यात करण्याचे ठरले होते. त्यासाठी विद्यापीठाने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी तसेच निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्याशीही संपर्क साधला होता; पण त्या वेळी नियोजित कार्यक्रम होऊ शकला नाही.

हेही वाचा… गजानन मालपुरे : सर्वसामान्य कार्यकर्ता

आता याच विद्यापीठात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी हे २१ डिसेंबर रोजी दीक्षान्त सोहळ्यासाठी येत आहेत; पण त्यांनी माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास असमर्थता दर्शवितानाच २१ तारखेच्या आधी अनावरण समारंभ उरकून घ्या, असे आपल्या कार्यालयामार्फत कळविल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाची तारांबळ उडाली. नरसिंहरावांनी ज्या पक्षाचे अध्यक्षपद भूषविलेत्या काँग्रेससह सत्ताधारी भाजपतील तोलामोलाचा एकही नेता विद्यापीठाला उपलब्ध होऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील उपक्रमशील सामाजिक कार्यकर्ते, माजी आमदार गिरीश गांधी यांच्या हस्ते नरसिंहरावांच्या पुतळ्याचे २०तारखेला अनावरण केले जाणार आहे.

हेही वाचा… राष्ट्रीय महामार्गाच्या आंदोलनातून आमदार लंके यांची लोकसभेसाठी वातावरण निर्मिती

राज्यपाल कोश्यारी यांनी अलीकडेच औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सोहळ्यात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. त्याचे पडसाद अद्यापही कायम आहेत. या पार्श्वभूमीवर रामटेक येथे नरसिंहरावांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे त्यांनी टाळले असावे, असे मानले जात आहे. मात्र राज्यपालांनी आपला नकार किंवा असमर्थता विद्यापीठाला लेखी स्वरूपात कळविलेली नाही, असे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2022 at 12:48 IST
ताज्या बातम्या