scorecardresearch

कोकणात ’तुल्यबळ‘ उमेदवारांमध्ये लढत

बाळाराम पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे हे दोन्ही उमेदवार आर्थिकदृष्ट्या तुल्यबळ असल्याने शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक तशीच ‘तुल्यबळ’ होणार आहे.

कोकणात ’तुल्यबळ‘ उमेदवारांमध्ये लढत
कोकणात ’तुल्यबळ‘ उमेदवारांमध्ये लढत ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

हर्षद कशाळकर

अलिबाग : कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील तर भाजप बाळासाहेबांची शिवसेना युतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. दोन्ही उमेदवार आर्थिकदृष्ट्या तुल्यबळ असल्याने शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक तशीच ‘तुल्यबळ’ होणार आहे.

शेकापचे बाळाराम पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक पुन्हा लढविण्याचा निर्णय बाळाराम पाटील यांनी घेतला आहे. त्यांना यंदा महाविकास आघाडीचे पाठबळ मिळणार आहे. गेल्या निवडणूकीत शिवसेनेच्या शिक्षक सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढविणारे ज्ञानेश्वर म्हात्रे हे यंदा भाजप- बाळासाहेबांची शिवसेना गटाचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढणार आहे.

हेही वाचा… नाशिक पदवीधरमध्ये कोण कोणाचे हा संभ्रम

गेल्या निवडणूकीतही शेकापला राष्ट्रवादी काँग्रेसची मदत झाली होती. मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीनंतर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संबध ताणले गेले होते. स्थानिक स्वराज्य संस्थामधील आघाडी तुटण्याची चिन्ह दिसू लागली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेकापच्या बाळाराम पाटलांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या निमित्ताने दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना काँग्रेस आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची रसद मिळणार आहे. शेकापचे बाळाराम पाटील यांचा विश्वास वाढला आहे.

हेही वाचा… अमरावती पदवीधर मतदारसंघात जागा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान

मतदारसंघाच्या स्थापनेपासून या मतदारसंघावर भाजप प्रणित शिक्षक परिषदेचा कायमच वरचष्मा राहीला आहे. मात्र गेल्या निवडणूकीत शिक्षक परिषदेत पडलेली फूट भाजपला चांगलीच भोवली होती. त्यांचे संस्थान शेकापने खालसा केले होते. महत्वाची बाब म्हणजे या पराभवानंतर पक्षाने संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आयत्यावेळी उमेदवार देतांना पक्षाची मोठी अडचण झाली होती. अखेर आयत्यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आणि मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून गेली सहा वर्ष सक्रीय असलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना गटाने त्यांच्या उमेदवारीला पाठींबा जाहीर केला. याशिवाय शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू यांची माघार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पथ्यावर पडणार आहे. गेल्या निवडणूकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

हेही वाचा… नागपूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा अडबाले यांना पाठिंबा

सहा वर्षात जे काम केले त्याच्या बळावर मी पुन्हा निवडणूकीला सामोरे जात आहे. महाविकास आघाडी पुरोगामी संघटना पाठींबा मला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, बहुजन संघटना, टिडीएफ पाठींबा दिला आहे. शाळांचे आणि शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मी विजयी होईन. – बाळाराम पाटील, महाविकास आघाडी पुरोगामी संघटनेचे उमेदवार

शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा शिक्षकच असला पाहीजे. त्यामुळे ही निवडणूक पुन्हा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणातील शिक्षकांची हीच अपेक्षा आहे. गेल्या निवडणूकीत पराभवानंतरही मी खचलो नाही. शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने झटत राहीलो. मतदारसंघ बांधणीवर भर दिला. त्याचे फळ यंदा मला मिळेल. – ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे उमेदवार

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 19:14 IST

संबंधित बातम्या