In Latur district election preparation started by all political parties | Loksatta

लातूर जिल्ह्यात पालिका निवडणुकीची धामधूम

निवडणुकांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नसले तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीत उतरले आहेत.

In Latur district election preparation started by all political parties
लातूर जिल्ह्यात पालिका निवडणुकीची धामधूम

प्रदीप नणंदकर

लातूर : जिल्ह्यात लातूर महानगरपालिका व निलंगा, औसा, अहमदपूर व उदगीर या चार नगरपालिका निवडणुका आगामी काळात होणार आहेत. या निवडणुकांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नसले तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीत उतरले आहेत.

करोना काळाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव जोरदार साजरा होत असून प्रत्येक ठिकाणी इच्छूक नगरसेवक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकसंपर्क करताना दिसत आहेत. आगामी काळात दसऱ्याच्या निमित्ताने नवरात्र महोत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा करून संधीचा लाभ जनसंपर्कासाठी घेताना कार्यकर्ते दिसतील.

लातूर महापालिकेत पहिल्यांदा भाजप सत्तेवर होता व अडीच वर्षानंतर भाजपच्या महापौराला हटवत काँग्रेसने महापौरपद मिळवले मात्र स्थायी समितीचे सभापतीपद भाजपकडेच होते. लातूर महापालिकेत भाजपा काँग्रेस हे तुल्यबळ स्थितीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिघेजण महाआघाडी करून निवडणूक लढवणार की स्वतंत्र लढवणार यावर महापालिकेत कोणाची सत्ता येणार हे अवलंबून आहे. आ.अमित देशमुख यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. कॉंग्रेस व भाजपा हे दोघेजण आपापल्या ताकदीने निवडणूक प्रचारात मग्न असल्याचे दिसते आहे.

हेही वाचा… गणेशोत्सवात राजकीय नेत्यांची संपर्क मोहीम, कार्यकर्ते, मतदारांच्या भेटीगाठींमुळे दमछाक

निलंगा नगरपरिषदेत भाजपची सत्ता होती. नगराध्यक्ष व १७ नगरसेवक भाजपचे तर एक नगरसेवक राष्ट्रवादी तर दोन नगरसेवक काँग्रेसकडे होते. गेल्या पाच वर्षात संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहराचा चेहरा मोहरा बदलला. दररोज शहराला नळाद्वारे पाणी दिले जाते. शंभर कोटी रुपये खर्च करून पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या उभ्या करण्यात आल्या आहेत. शहरात हरितपट्ट्यात सभागृह, पंचायत समिती व तहसीलची भव्य इमारत नाट्यगृह याद्वारे शहरात भाजपने आपले पाय अधिक मजबूत केले आहेत. विरोधक एकत्र लढले तर काही प्रमाणात लढा देऊ शकतील अन्यथा भाजप हा आपला गड कायम राखेल अशी स्थिती आहे. औसा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष राहिला. या नगरपरिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे हाडवैर मात्र कायम राहिले. महाविकास आघाडी करून निवडणूक लढवली जाणार का? काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मोट बांधली जाणार का? यावर पालिका कोणाच्या ताब्यात जाणार हे ठरणार आहे. अहमदपूर नगरपालिकेत भाजपाची सत्ता होती, पूर्वी विनायकराव पाटील मित्र मंडळ हा मजबूत होता हा गटच आता भाजपामध्ये आल्याने भाजपची शक्ती चांगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना हे एकत्र लढणार का? हाही प्रश्न आहे. उदगीर नगरपालिकेत भाजपची सत्ता होती. उदगीर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला आणि राष्ट्रवादीने आपले पाय चांगलेच रोवले. काँग्रेसही मदतीला होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेस व राष्ट्रवादी बद्दल चांगले वातावरण निर्माण झाले होते. आता सत्ता बदल झाला आहे तेव्हा भाजपकडून पालिका महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवून खेचून आणेल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. निवडणुका जाहीर होतील तेव्हा होतील सर्वच ठिकाणी सर्व राजकीय पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांच्या मागे शक्ती उभी करण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहेत.

हेही वाचा… ..तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढच्या वर्षीच !

जिल्ह्यात भाजप आपली शक्ती टिकवण्यासाठी पक्षांतर्गत एकजूट ठेवतो की विरोधकांच्या सापळ्यात अडकतो, हाही कळीचा मुद्दा ठरणार आहे. राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्यातील कोणाला स्थान मिळेल? यावरही पुढील रणनीती अवलंबून आहे. सध्या सगळीकडे अंदाज घेण्याचे काम जोर धरते आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-09-2022 at 10:07 IST
Next Story
नेटकऱ्यांनी ट्रोल केलेल्या युवा गोलंदाज अर्शदिपला पंजाबमधील सर्व राजकारण्यांचा पाठिंबा