मध्य प्रदेशमधील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये निवडून न आलेले सदस्य पदाची शपथ घेताना दिसत आहेत. या प्रकरणात मध्य प्रदेशच्या पंचायत राज विभागाने सोमवारी एक आदेश जाहीर केला आहे. या आदेशामध्ये संबंधित जिल्हाधिकार्‍यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यासोबतच पंचायत व्यवस्थेत निवडून न आलेल्या लोकांना पदाची शपथ देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.  सागर, दमोह आणि धार जिल्ह्यांतर्गत किमान तीन पंचायतींमध्ये निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींचे पती, मेहुणे आणि सासरे यांना अधिकृत शपथ देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर हा आदेश जाहीर करण्यात  करण्यात आला आहे.

याबाबत पंचायत राज संचालक आलोक कुमार सिंह म्हणाले, “आम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकरणांमध्ये आवश्यक कारवाई करण्यास सांगितले आहे. वृत्तानुसार ४ ऑगस्ट रोजी सागर जिल्ह्यातील जैसीनगर आणि जरुआखेडा पंचायतींमध्ये ‘प्रथम संमेलना’ दरम्यान शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी दोन्ही पंचायतींमधील प्रत्येकी १० महिलांसह  २१ निवडून आलेल्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र जैसीनगरमध्ये केवळ तीन तर जरुआखेडा येथे पाच महिलांनी हजेरी लावली. महिला न आल्याने एका महिलेचे मेहुणे, दुसऱ्या महिलेचे सासरे आणि इतर दोघांचे पती आले आणि त्यांना संबंधित ग्रामपंचायत सचिवांनी शपथ दिली.

मात्र निवडून आलेल्या महिलांऐवजी पुरुष शपथ घेत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलांना त्यांच्या संबंधित पंचायत कार्यालयात बोलावून दुसऱ्या दिवशी शपथ देण्यात आली, तर दुसऱ्या दिवशी या प्रकरणात अधिकारी साहू आणि चडू यांना निलंबित करण्यात आले.’द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना, चडू म्हणाले: “निर्वाचित दहा महिलांपैकी पाच महिला शपथविधीसाठी उपस्थित होत्या तर उर्वरित पाच महिलांचे नातेवाईक आले होते. पण आजूबाजूला बरेच पुरुष होते आणि मी त्यांना जाण्यास सांगू शकलो नाही आणि त्यांनी इतर महिलांसह शपथ घेतली. मात्र दुसऱ्या दिवशी निवडून आलेल्या महिलांना शपथ देण्यात आली

सागरचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी सांगितले की, जिल्हा पंचायतीच्या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी होईपर्यंत दोन्ही सचिवांना निलंबित केले जाईल. ही घटना उघडकीस आल्यानंतर एका दिवसानंतर आमचे निरीक्षक संबंधित पंचायत कार्यालयात पाठवण्यात आले आणि निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींना शपथ देण्यात आली. आम्ही या घटनेची बारकाईने चौकशी करू आणि वस्तुस्थितीच्या आधारे पुढील शिस्तभंगाची कारवाई निश्चित केली जाईल”. हट्टा जनपदाचे सीईओ ब्रतेश जैन ज्यांच्या अंतर्गत गयासाबाद पंचायत येते, ते म्हणाले की “व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी या प्रकरणाची चौकशी केली आणि धूनसिंग राजपूतची चूक असल्याचा अहवाल पाठवण्यात आला, असा प्रकार फक्त एकाच पंचायतीत झाला आहे.