Premium

मराठवाड्यात ‘खान की बाण’, ‘मराठा- ओबीसी’ प्रारुप विस्तारणार ?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणाची मागणी २०१९ च्या निवडणुकपूर्वी जोर धरू लागली होती. ‘औरंगाबाद’च्या मोर्चानंतर राज्यभर ५८ मोर्चांना दिशा मिळाली.

marathwada lok sabha election, khan or baan marathwada
मराठवाड्यात ‘खान की बाण’, ‘मराठा- ओबीसी’ प्रारुप विस्तारणार ? (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखालील आंदोलनानंतर ‘खान की बाण’ आणि ‘मराठा – ओबीसी’ या दोन स्तरावरील निवडणूक लढ्याचे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील प्रारुप मराठवाडाभर निर्माण होण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे. असे राजकीय सूत्र निर्माण झाले तर वंचित बरोबर असणारी युती उद्धव ठाकरे गटासाठी लाभकारक ठरू शकेल असा दावा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक असणारे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे दोघेही ‘ओबीसी’ श्रेणीतील असल्याने मतपेढीचे विभाजन यावरुन आतापासून गणिते मांडली जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणाची मागणी २०१९ च्या निवडणुकपूर्वी जोर धरू लागली होती. ‘औरंगाबाद’च्या मोर्चानंतर राज्यभर ५८ मोर्चांना दिशा मिळाली. या मोर्चानंतर निर्माण झालेल्या मतपेढीच्या राजकारणात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामाना करावा लागला. तेव्हा भाजप- शिवसेना युतीमध्ये असताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तीन लाख ८४ हजार ५५० एवढी मते मिळाली होती तर विजयी उमेदवार इत्मियाज जलील यांना तीन लाख ८८७८४ मते मिळाली. चार हजार २३४ मतांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना दोन लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली. ही मते मराठा आरक्षण मागणीच्या मानसिकतेमधून निर्माण झालेली मतपेढी होती. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठा मतदारांची संख्या साडेपाच लाखांच्या घरात आहेत. या आकडेवारीच्या आधारे दोन ओबीसी उमेदवारी रिंगणात राहिले तर या प्रश्नामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे गटात बराच खल सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. माळी, धनगर, वंजारी हे ‘माधव’ सूत्र आता तालुका पातळीपर्यंत संघटित झाले आहे तर त्यापेक्षा कमी संख्येने असणारा बारा बलुतेदार हा घटक गावस्तरावर आहे. त्यामुळे मतपेढीचे विभाजन झालेच तर कोणत्या स्तरापर्यंत जाईल, हेही तपासले जात आहे.

हेही वाचा : श्रीशिवपुराण कथा सोहळा आयोजनातून मतपेरणी, पालकमंत्री दादा भुसे यांचा पुढाकार

राज्यातील राजकीय पटलावर घडलेल्या घडामोडींचा लोकसभा मतदारसंघात होणारे परिणाम लक्षात घेऊन सर्व पक्षीय पुनर्मांडणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘एमआयएम’ या पक्षावर होणारी विखारी ‘हिरवा साप’, ‘रझाकार’ अशी शिलकी विशेषणे देत केली जाणारी टीका आता उद्धव ठाकरे गटाकडून केली जात नाही. त्यामुळे नव्या समीकरणात काही मुस्लिम मतही उद्धव ठाकरे गटाकडे वळतील, असे सांगण्यात येत आहे. तसेच वंचित बरोबर शिवसेनेची युती झाली असल्याने प्रकाश आंबेडकर समर्थक मतदान उद्धव ठाकरे गटाला मिळेल, असा दावाही केला जात आहे.

हेही वाचा : अमरावतीत ‘इंडिया’ आघाडीत उमेदवारीवरून संभ्रमावस्‍था

छत्रपती संभाजीनगरमधील ‘खान की बाण’ सोबत ‘मराठा-ओबीसी’ हे प्रारुप मराठवाड्यातील हिंगोली, धाराशिव या दोन मतदारसंघातही जमून येऊ शकते काय, याची चाचपणीही सुरू असल्याचे सांगण्यात येते. ‘ओबीसी’ मतांचा प्रभाव असणाऱ्या बीड मतदारसंघातही मराठा मतपेढीचे गणित नव्याने मांडले जात आहे. बीड मतदारसंघात धनंजय मुंडे हे पालकमंत्री असल्याने जिल्ह्यातील मराठा नेते नेहमी अस्वस्थ असतात. मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनामुळे आरक्षण प्रश्न निकाली निघण्यापूर्वी त्याच्या मतपेढीच्या परिणामावर उघड चर्चा सुरू झाल्या आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In marathwada role of khan or baan and impact of maratha obc reservation on upcoming lok sabha election print politics news css

First published on: 28-11-2023 at 14:34 IST
Next Story
काँग्रेसला सोडून पंतप्रधान मोदींची केसीआर यांच्यावर टीका; तेलंगणामध्ये भाजपाची वेगळी रणनीती का?