नागपूर : ‘माझी लाडकी बहीण योजने’च्या विरोधात उच्च न्यायालयात जाणाऱ्या सावत्र भावाला येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवा, अशी टीका काँग्रेसचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्य शासनातर्फे ‘माझी लाडकी बहीण योजना’ मेळावा नागपुरातील रेशीमबाग मैदानावर शनिवारी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी या योजनेला विरोध करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महिला व बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना आजवरची सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेने सर्व विक्रम मोडले आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ही योजना बंद व्हावी यासाठी काही लोक न्यायालयात जात आहेत. यापूर्वी ते उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीडात गेले होते. न्यायालयाने याचिका फेटाळली. आता त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या सावत्र भावापासून सावध राहा आणि त्यांना योग्यवेळी धडा शिकावा, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा : जरांगेंचा भाजपवरच राग का? शिंदे, अजित पवारांवर टीकेची तीव्रता कमी
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी ७ लाख लाभार्थी होते. दुसऱ्या टप्प्यात आज ५२ लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. अडीच कोटी महिलांना या योजनाचा लाभ देण्याचे लक्ष्य आहे. २५ हजार अर्ज रद्द झाले आहेत. त्यांना देखील या योजनेत समावून घेतले जाईल, असे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
विकासकामांवर परिणाम नाही – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेबाबत विरोधक चेष्टा करीत असल्याची टीका केली. महिलांना सक्षम करणारी ही योजना सुरू केली असून मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांचे वीज देयक माफ व इतरही योजना सुरू आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ७५ हजार कोटींची तरतूद आहे. या योजनांवरील खर्चामुळे विकास कामांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावाही पवार यांनी केला.
महिलांना सक्षम करणारी योजना – गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले. ही योजना महिलांना आर्थिक सक्षम करणारी आहे. महिला त्यांच्या पायावर उभ्या राहतील व कुटुंबाला गरिबीतून, उपासमारीतून बाहेर काढतील. ई-रिक्षाला सामाजिक न्याय विभाग अर्थसहाय देत असल्याने महिलांना ई-रिक्षाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करण्याची संधी मिळाली आहे. राज्यात महिलांची आर्थिक जाणीव अधिक जागृत असून महिला बचत गटाचे काम सर्वांत चांगले आहे, असे गडकरी म्हणाले.
हेही वाचा : RSS UP: लोकसभेत पेपरफुटीचा भाजपाला फटका; उत्तर प्रदेशमध्ये आता RSS सक्रिय, भरतीप्रक्रियेतील उमेदवारांना मदत
काँग्रेसकडून योजनेविरोधात याचिका – फडणवीस
अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात याचिका केली आहे. वडपल्लीवर यांचे संबंध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्याशी आहे. सरकारतर्फे निष्णात वकील न्यायालयात उभा केला जाईल आणि ही योजना बंद होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महिलांवरील अत्याचाराबाबत फडणवीस म्हणाले, ‘‘ही समाजाला लागलेली कीड आहे. ती थांबवण्यासाठी महिला ही उपभोगाची वस्तू नव्हेतर ती माता, आई, बहीण असल्याची घराघरांत शिकवण दिली गेली पाहिजे. पण, अत्याचार करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा केली जाईल,’’असेही फडणवीस म्हणाले.