scorecardresearch

नागपूर महापालिका निवडणुकीत आंबडेकरी मतांचे विभाजन अटळ

नागपूर शहरात दलित मतांची संख्या सुमारे ४० टक्के आहे.

राजेश्वर ठाकरे

बहुजन समाज पार्टीतून बाहेर पडून नवा पक्ष स्थापन केलेले ॲड. सुरेश माने यांनी नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आघाडी करण्याचा प्रस्ताव बहुजन समाज पार्टीने फेटाळला आहे. त्यामुळे माने यांनी दिलेला प्रस्तावाचा अंकुर रोपटे होण्यापूर्वीच कोमजल्याचे चित्र निर्माण झाले असून यंदाही महापालिका निवडणुकीत दलित मतांचे विभाजन अटळ ठरणार आहे. ॲड. माने यांनी त्यांचा पक्ष बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा (बीआरएसपी) विदर्भस्तरीय मेळावा अलीकडे नागपुरात घेतला. याप्रसंगी त्यांनी महापालिका निवडणुकीत बसपा आणि वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाबाबत बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजणे यांनी मात्र कठोर प्रतिक्रिया देत तो प्रस्ताव धुडकावून लागला. त्यामुळे आंबेडकरी मतांचे विभाजन टाळण्याच्या प्रयत्नांना याही निवडणुकीत यश येणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

नागपूर शहरात दलित मतांची संख्या सुमारे ४० टक्के आहे. त्यामुळे काही दशकांआधी नागपूर महापालिकेत रिपब्लिकन पक्षाचा दबदबा होता. मात्र, नंतरच्या काळात आरपीआयची पकड ढिली झाली आणि आंबेडकरी चळवळीला राजकीयदृष्ट्या घरघर लागली. ही बाब लक्षात घेऊन ॲड. माने यांनी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आंबेडकरी विचारांच्या वेगवेगळ्या पक्षांनी एकत्रित निवडणुकीचा विचार मांडला आहे.

एकीकडे आरपीआयचे वेगवेगळे गट निवडणूक लढवून मतांचे विभाजन होत असताना बसपाने नागपुरात संघटन मजबूत केले. आरपीआयची पोकळी थोडीफार भरून काढली. २०१७ मध्ये बसपाचे १० नगरसेवक निवडणूक आले. मात्र, उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर आणि पश्चिम नागपुरातील दलित मतांची संख्या बघता नगरसेवकांची ही आकडेवारी फारच कमी आहे. बसपा, बीआरएसपी आणि दलित पक्ष, संघटना एकत्र आल्यातर बहुसंख्येने आंबेडकरी नगरसेवक निवडून येऊ शकतात. कदाचित हीच बाब लक्षात घेऊन माने यांनी बसपाला प्रस्ताव दिला असावा. मात्र माने हे पूर्वी बसपामध्ये होते. आणि पक्ष नेतृत्वावर टीका करून ते पक्षातून बाहेर पडले होते. हा राग अजूनही बसपाच्या मनात असावा, असे ताजणे यांच्या प्रतिक्रियेतून दिसून येते. त्यामुळे माने यांनी दिलेला प्रस्तावाचा अंकुर रोपटे होण्यापूर्वीच कोमजल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ॲड.माने यांनी २०१९ ची लोकसभा नागपुरातून लढली होती. त्यांना ३,४१४ मते मिळाली होती. तर बसपाला ३१,७२५ आणि वंचित बहुजन आघाडीला २६, १२८ मते प्राप्त झाली होती. सध्या वंचित बहुजन आघाडीचा एकही नगरसेवक नाही. बसपाचे दहा नगरसेवक आहेत. सर्व आरपीआय गट आणि बसपाने एकत्र लढल्यास दलितांची मतांची संख्या बघता महापौर होऊ शकतो. परंतु बसपाचा भर स्वतंत्रपणे लढण्यावर असतो. त्याचाच प्रत्यय ॲड. माने यांच्या प्रस्तावावर बसपा प्रदेशाध्यक्ष ताजणे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In nagpur municipal corporation election division of ambedkar followers votes is unavoidable