नांदेड : भाजपा आणि काँग्रेस या पक्षांतर्फे शुक्रवारी नांदेडमध्ये झालेल्या निषेध आंदोलनाच्या निमित्ताने भाजप खासदार अशोक चव्हाण व काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत हे नेते प्रथमच आमने- सामने आले. त्यातही सावंत यांची आक्रमकता अधिक ठळक झाली.

काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर खासदार चव्हाण यांनी पक्षातर्फे शुक्रवारी राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनातून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर प्रथमच टीका केली. त्याच वेळी चव्हाणांचे काँग्रेस पक्षाबरोबर असलेले मित्र व सहकारी डी. पी. सावंत यांनी भाजपच्या आंदोलकांचा समाचार घेताना राहुल गांधी यांचा निषेध करताना त्यांना लाज कशी वाटत नाही, अशा कडक शब्दांत फटकारले.

नांदेडमध्ये काँग्रेस व भाजपची आंदोलने वेगवेगळ्या ठिकाणी पार पडली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखतीत भारतातील आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपाने राज्यभर आंदोलन केले. नांदेडमधील घोषणाबाजीत अशोक चव्हाण व त्यांचे समर्थकही सहभागी झाले होते.

हेही वाचा : PM Modi Election Rallies: हरियाणात विजय मिळवणं भाजपासाठी महत्त्वाचं का? ही आहेत तीन कारणे…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन आरक्षणाच्या विषयी जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. निषेधार्ह आहे. यातून काँग्रेसची नीती स्पष्ट होते. राहुल गांधी यांचा मी निषेध करतो.

खा. अशोक चव्हाण

भाजप नेते राहुल गांधी यांच्या विरोधात बोलतात. त्यांना लाज वाटली पाहिजे. ते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण करतात. त्यांच्या या भूमिकेचा निषेध म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.

डी. पी. सावंत