नांदेड : खासदार अशोक चव्हाण आणि त्यांचा परिवार हळूहळू भाजपाच्या संस्कृतीत रुळत असताना या परिवाराला श्रद्धास्थानी असलेले माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण यांचे ज्येष्ठ जामात भास्करराव पाटील खतगावकर हे विधानसभा निवडणुकीसाठी बंडाच्या तयारीत आहेत तर शंकररावांच्या कनिष्ठ जावयांच्या बंधुंनी बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश करत या पक्षाकडे उमेदवारी मागण्याची तयारी सुरू केली आहे.

दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी सुरू झाली असून या पक्षाने अलीकडेच अशोक चव्हाण यांच्यावर नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविली असून ते पक्षांतर्गत बाबींमध्ये लक्ष घालत असताना खतगावकर परिवाराचा वेगळा पवित्रा बुधवारी समोर आला.

हेही वाचा : शून्य आमदार नि एक खासदार! पश्चिम बंगालमध्ये राजकीय विजनवासात जाण्यापासून काँग्रेस स्वत:ला कसं रोखणार?

अशोक चव्हाण यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी भाजपामध्ये अचानक प्रवेश केल्यानंतर तेव्हा काँग्रेस पक्षात असलेल्या खतगावकर व त्यांच्या समर्थकांनी पुढील राजकीय वाटचाल चव्हाणांसोबत करण्याचे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत खतगावकर यांनी भाजपाचेच काम केले. तत्पूर्वी त्यांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील यांनी भाजपाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती, पण पक्षाने प्रताप चिखलीकर यांच्यावरच विश्वास दर्शविला. त्यानंतर डॉ.मीनल पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, यासाठी चव्हाण-खतगावकर यांनी संयुक्तपणे प्रयत्न केले, तरी भाजपा नेत्यांकडून त्यांना दाद मिळाली नाही.

डॉ.मीनल पाटील यांची लोकसभेची तसेच विधानसभेची संधी हुकल्यानंतर खतगावकर समर्थकांनी आता स्वबळाचा संकल्प सोडला असून डॉ.मीनल पाटील यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघांतून अपक्ष निवडणूक लढवावी, अशा हालचाली सुरू झाल्या असून खुद्द डॉ.मीनल यांनी तसे संकेत दिले. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपाचे राजेश पवार हे करतात. त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, यासाठी त्या भागातील एक मोठा गट सक्रीय झाला असला, तरी त्यावरच्या अंतिम निर्णयांत बराच कालापव्यय होण्याची शक्यता असल्याने खतगावकर गटाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची जुळवाजुळव चालवली आहे. त्याची सुरुवात श्रावणाच्या पहिल्या सोमवारी धर्माबादजवळ होणार्‍या एका मोठ्या कार्यक्रमाद्वारे होईल, असे समजले.

हेही वाचा : ‘मावळ’वरून महायुतीत तिढा? राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपचा दावा

शंकरराव चव्हाण यांचे कनिष्ठ जावई संजीव लोंढे हे अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यांचे चूलतबंधू डॉ.प्रदीप लोंढे यांनी येथील गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेत दीर्घकाळ अध्यापनाची जबाबदारी पार पाडली. अलीकडेच सेवेतून निवृत्त झालेल्या लोंढे यांनी बुधवारी जिल्हा काँग्रेस कार्यालयास भेट देऊन पक्षाचे सभासदत्व स्वीकारले. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघांतून ते काँग्रेसकडे उमेदवारी मागणार आहेत.