नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी काही आजी-माजी आमदारांची पूर्वतयारी सुरू झालेली असतानाच जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांच्या वारसदारांची दावेदारी समोर आली असून त्यांत श्रीजया अशोक चव्हाण, प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण, डॉ.मीनल पाटील खतगावकर यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे नऊ मतदारसंघ असून महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांतून अनेक इच्छुक आतापर्यंत समोर आले. त्यांतील काहींनी मागील महिनाभरात वेगवेगळ्या उपक्रमांतून आपल्या उमेदवारीचे संकेत दिले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाजपाने राज्यसभेवर वर्णी लावल्यानंतर त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात त्यांची कन्या श्रीजया हिला भाजपाची उमेदवारी मिळणारच, हे गृहीत धरून चव्हाण परिवार आणि त्यांच्या समर्थकांनी तयारी सुरू केली. श्रीजया चव्हाण यांनी गावभेटी, बैठका आणि मेळाव्यांच्या माध्यमातून लोकसंपर्क वाढविला आहे.

हेही वाचा : कारण राजकारण: ‘मातोश्री’च्या अंगणात जागावाटपाचे त्रांगडे

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी २००९ ते २०१९ दरम्यान नायगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मागील पाच वर्षे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून विद्यमान आमदार राजेश पवार यांना पक्षातूनच काही इच्छुकांनी आव्हान दिल्याचे दिसत असताना, खासदार चव्हाण यांचे पुत्र प्रा.रवींद्र यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरील आपला इरादा नुकताच उघड केला.

नायगावमध्ये भाजपाच्या उमेदवारीसाठी मारोतराव कवळे, शिवराज पाटील होटाळकर यांच्या नावांची चर्चा मतदारसंघात सुरू झालेली असताना ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर यांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील यांचेही नाव समोर आले आहे. भाजपाने त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, असा प्रयत्न गेल्या महिन्यात झाला. पण ही संधी हुकल्यानंतर खतगावकर समर्थकांनी डॉ.मीनल यांना नायगावमध्ये उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : काकांचा पत्ता कापून अखिलेश यादवांनी ब्राम्हण नेत्याला दिले विरोधी पक्षनेतेपद; कोण आहेत माता प्रसाद पांडे?

मोठ्या राजकीय घराण्यांतील वारसदारांची नावे वरील दोन मतदारसंघांमध्ये चर्चेत असताना, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील यांनीही विधानसभेच्या माध्यमातून आपल्या पुनर्वसनाचा राजकीय पट उभा केला असून चिखलीकर यांनी १० वर्षानंतर आपल्या लोहा या पारंपरिक मतदारसंघाचा आधार घेतला आहे. भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या विद्यमान आमदारांपैकी भीमराव केराम (भाजपा, किनवट), माधवराव जवळगावकर (काँग्रेस, हदगाव), बालाजी कल्याणकर (शिवसेना, नांदेड उत्तर), राजेश पवार (भाजपा, नायगाव), डॉ.तुषार राठोड (भाजपा, मुखेड) हे फेरउमेदवारीचे दावेदार आहेत. काँग्रेसचे जीतेश अंतापूरकर यांना या पक्षातून पुन्हा संधी नाही तर नांदेड दक्षिणचे मोहन हंबर्डे यांच्याबाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे.

आजी-माजी आमदार आणि काही प्रस्थापितांचे वारस यांच्या दावेदारीने कार्यकर्त्यांतून कोणाला, कोठे संधी मिळणार याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. पण काँग्रेस पक्षाला भोकरसह देगलूरमध्ये तर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नांदेड उत्तर मतदारसंघात नवा उमेदवार देण्यास वाव आहे. भाजपा तसेच महायुतीतील अन्य पक्षांमध्ये कार्यकर्त्यांतून कोणालाही उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. लोहा मतदारसंघ आघाडी आणि महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, हे स्पष्ट होण्यापूर्वीच चिखलीकर व त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत.

हेही वाचा : कोण असेल प्रशांत किशोर यांच्या नव्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष; राजद, जेडीयू नि भाजपाला या पक्षाविषयी काय वाटतं?

चिखलीकरांचा पुण्यामध्ये मेळावा

मागील काही आठवड्यांपासून लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची तयारी करणार्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी गेल्या रविवारी पुण्यामध्ये एक मेळावा घेतला. पुणे व आसपासच्या परिसरात लोहा-कंधार मतदारसंघांतील हजारो मतदार उद्योग, व्यवसाय तसेच नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. अशा सर्व मतदारांची माहिती संकलित करून चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयाने घडवून आणलेल्या मेळाव्यास सुमारे तीन हजार मतदार उपस्थित होते. या मेळाव्यात चिखलीकर यांनी लोहा-कंधार मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले.