scorecardresearch

नाशिक पदवीधरमध्ये कोण कोणाचे हा संभ्रम

नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणूक आता सत्यजित तांबे, ॲड. शुभांगी पाटील आणि ॲड. सुभाष जंगले या तीन प्रमुख अपक्ष उमेदवारांमध्ये रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक पदवीधरमध्ये कोण कोणाचे हा संभ्रम
नाशिक पदवीधरमध्ये कोण कोणाचे हा संभ्रम ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

अनिकेत साठे

नाशिक : अखेरच्या क्षणी टाकलेल्या डावपेचांमुळे रंगतदार ठरलेली नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणूक आता सत्यजित तांबे, ॲड. शुभांगी पाटील आणि ॲड. सुभाष जंगले या तीन प्रमुख अपक्ष उमेदवारांमध्ये रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माघारीच्या अखेरच्या दिवशी सहा जणांनी माघार घेतल्याने रिंगणात १६ उमेदवार आहेत. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी शहरात ठाण मांडून पक्षातील इच्छुकांच्या माघारीचे नियोजन केले असले तरी तांबे यांना अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर करण्याचे टाळले. दुसरीकडे, ॲड. शुभांगी पाटील यांना शिवसेनेने सायंकाळी उशिरापर्यंत अधिकृत पाठिंबा जाहीर न केल्याने सुभाष जंगले यांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत.

हेही वाचा… उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा

काँग्रेस उमेदवाराची ऐनवेळी माघार आणि भाजपची उमेदवार न देण्याची खेळी या डावपेचामुळे रंगलेल्या या मतदार संघातील चित्र माघारीची मुदत संपल्यानंतर स्पष्ट झाले आहे. छाननी प्रक्रियेत सात उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले होते. सोमवारी माघारीच्या अंतिम मुदतीत माघार घेणाऱ्यांमध्ये निवडणुकीसाठी काही महिन्यांपासून तयारी करणारे भाजपचे धनंजय विसपुते आणि याच पक्षाशी संबंधित धनंजय जाधव यांचा समावेश आहे. काँग्रेसचे अर्ज न भरणारे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या उमेदवारानेही माघार घेतली आहे.

हेही वाचा… अमरावती पदवीधर मतदारसंघात जागा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान

निवडणुकीच्या रिंगणात १६ उमेदवार राहिले असून त्यात राष्ट्रीय पक्षाचा अधिकृत एकही उमेदवार नाही. अखेरच्या क्षणी घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींनी निवडणुकीत वेगळेच रंग भरले गेले. काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेऊन अर्ज दाखल केला नाही. त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने काँग्रेसची कोंडी झाली. डॉ. तांबे यांच्या भूमिकेने काँग्रेस, पर्यायाने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार रिंगणात राहिला नाही. ही भाजपची चाल असल्याचे लक्षात घेत शिवसेनेने (ठाकरे गट) फासे टाकण्यास सुरूवात केली. नागपूर मतदारसंघातून माघार घेऊन ठाकरे गटाने नाशिकवर लक्ष केंद्रित केले. भाजपने उमेदवारी नाकारलेल्या ॲड. शुभांगी पाटील यांनी मुंबईत उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्यालाच ठाकरे गटाचा पाठिंबा असल्याचा दावा केला. महाराष्ट्र शिक्षक संघटनेच्या संस्थापक तथा राज्याध्यक्ष असणाऱ्या ॲड. पाटील निवडणुकीतील एकमेव महिला आहेत. माघारीसाठी दबाव येईल हे जाणून त्यांनी सोमवारी कोणाशीही संपर्क ठेवला नाही. अहमदनगरचे ॲड. सुभाष जंगले यांनीही आपणास ठाकरे गटाचा पाठिंबा मिळेल, असा दावा करुन नगरचे ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख बबन घोलप हे आपल्यासाठी आग्रही असल्याचे नमूद केले. पाटील की जंगले या दोन वकिलांपैकी कोणाला पाठिंबा द्यावा, यावरुन ठाकरे गटातच अनिश्चितता असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत त्यावर तोडगा निघू शकला नव्हता. ठाकरे गट ज्याला पाठिंबा देईल, तोच महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार राहील, एवढे निश्चित असताना भाजपनेही अधिकृतरित्या तांबे यांना पाठिंबा जाहीर न केल्याने चुरस अजूनही कायम आहे.

हेही वाचा… नागपूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा अडबाले यांना पाठिंबा

भाजपशी संबंधित उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे देखील नाशिकला दाखल झाले. भाजप आणि अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या दोघांनी माघार घेतली. मात्र ॲड. शुभांगी पाटील यांची माघार शक्य झाली नाही. अर्थात महाजन यांनी ते मान्य केले नाही. उलट त्यांच्याशी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. कोणी अर्ज मागे घ्यावा अथवा राहू द्यावा, याकरिता आमचा कुठलाही प्रयत्न नसल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. तांबे यांना अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर न केलेल्या भाजपची माघारीच्या दिवशी संपूर्ण धडपड ही सत्यजित तांबे यांच्या मार्गातील अडसर दूर करण्याकडे राहिली. पुरस्कृत उमेदवाराच्या सहाय्याने पदवीधर मतदार संघ प्रदीर्घ काळानंतर आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

हेही वाचा… बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्त्व ‘अवसरवादी’ पण उद्धव यांच्याबरोबरील युती धर्म सुधारणावादी; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

नगर विरुध्द उत्तर महाराष्ट्र सामना ?

डॉ. सुधीर तांबे यांनी आधीपासून मतदार नोंदणीकडे लक्ष दिले होते. भाजपच्या इच्छुकांनी त्या अनुषंगाने प्रयत्न केले. या निवडणुकीत दोन लाख ५२ हजार ७३१ मतदार असले तरी सर्वाधिक एक लाख १५ हजार ६३८ मतदार एकट्या नगर जिल्ह्यातील आहेत. उर्वरित नाशिकमध्ये ६९६५२, जळगाव ३५०५८, धुळे २३४१२ आणि नंदुरबारमध्ये १८९७१ मतदार आहेत. एक, दीड दशकापासून नाशिक पदवीधर मतदार संघावर नगरचे वर्चस्व राहिलेले आहे. ॲड. सुभाष जंगले हेही अहमदनगर जिल्ह्यातील असून ॲड. शुभांगी पाटील या धुळ्याच्या आहेत. पाटील यांच्या जळगाव, नंदुरबार येथील संघटना, शिक्षण संस्थांशी संबंध आहेत. त्यामुळे प्रादेशिक अस्मितेला खतपाणी घालत हा सामना नगर विरुध्द उत्तर महाराष्ट्र या वळणावर नेला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 17:40 IST

संबंधित बातम्या