नाशिक: महायुतीत दिंडोरीमधून भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंड केले असताना, नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटालाही बंडखोरीचा त्रास सहन करावा लागत आहे. ऐनवेळी डावलल्याने नाराज असणारे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शुक्रवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करुन नाशिक लोकसभा मतदार संघात बंडखोरी केली आहे. समर्थकांचा मेळावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सूचित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना नाशिक मतदारसंघात उमेदवारी दिल्यापासून करंजकर हे नाराज आहेत. ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून ते तेव्हापासून अलिप्त आहेत. वर्षभरापूर्वी पक्षाने या जागेवर तयारी करण्याचे निर्देश करंजकर यांना दिले होते. त्यानुसार आपण तयारी करुन मतदारसंघात दोन ते तीन दौरे पूर्ण केले होते. असे असताना अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारली गेली. त्याचे कारण समजले नाही. ते कळले असते तर बरे झाले असते, असे करंजकर यांनी अर्ज भरल्यानंतर सांगितले.

हेही वाचा : अमेठीतले काँग्रेस उमेदवार केएल शर्मा कोण आहेत? राजीव गांधींशी काय आहे कनेक्शन?

करंजकर हे मध्यंतरी शिंदे गटाच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते. यावर त्यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पूर्वी शिवसेनेत प्रदीर्घ काळ एकत्र काम केले, परंतु, आपण ठाकरे गटाचे पक्षप्रमुख यांच्या सानिध्यात राहिल्याचा दाखला दिला. नाशिकची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मातोश्रीवरून तीनवेळा भेटण्यासाठी वेळ दिली गेली. परंतु, प्रत्येकवेळी आदल्या दिवशी रात्री त्यामध्ये बदल झाले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याने पक्षप्रमुखांशी भेट होऊ शकली नाही. युवानेते वरूण सरदेसाई यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा झाली, तेव्हा आपण आपली खंत व्यक्त केली. शिवसेनेतील काही पदाधिकारी, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, असे करंजकर यांनी सांगितले. करंजकर यांची बंडखोरी ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे मनधरणी करून माघारीसाठी त्यांना तयार करण्याचे नियोजन केले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik uddhav thackeray shivsena leader vijay karanjkar file nomination form as independent candidate print politics news css