scorecardresearch

नव्या एकनाथ शिंदे-भाजप सरकारमध्ये या प्रशासकीय चेहऱ्यांवर लक्ष

महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर काही अधिकाऱ्यांना कोणती जबाबदारी मिळते याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

In new government administration will have these administrative officers
नव्या एकनाथ शिंदे-भाजप सरकारमध्ये या प्रशासकीय चेहऱ्यांवर लक्ष

सौरभ कुलश्रेष्ठ

सरकार बदलले की त्या सरकारचा प्रशासकीय चेहराही बदलतो. नेतृत्वाच्या आवडीनुसार काही प्रशासकीय अधिकारी महत्त्वाच्या पदांवर येतात तर काही अधिकारी थोडे बाजूला पडतात. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजप यांचे सरकार आल्यावर अशाच काही अधिकाऱ्यांना कोणती जबाबदारी मिळते याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

भूषण गगराणी – सध्या नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेले भूषण गगराणी हे मागील फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे-भाजप सरकारमध्ये भूषण गगराणी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील फडणवीस सरकारमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांचे स्थान गगराणी यांना मिळू शकते अशी चर्चा आहे.

अश्विनी भिडे – मागील फडणवीस सरकारच्या काळात अश्विनी भिडे या मेट्रो ३ प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत आहेत. एकनाथ शिंदे-भाजप यांच्या नवीन सरकारमध्ये अश्विनी भिडे यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते.

प्रवीण दराडे – प्रवीण दराडे हे मागील फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अशा महत्त्वाच्या ठिकाणी काम करत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते बाजूला पडले. आता एकनाथ शिंदे-भाजप सरकारमध्ये प्रवीण दराडे पुन्हा एकदा महत्त्वाच्या पदावर दिसतील अशी चर्चा आहे.

संजीव जयस्वाल– मागील फडणवीस सरकारच्या काळात संजीव जयस्वाल हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांचे जवळचे अधिकारी अशी त्यांची ओळख झाली होती. त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये संजीव जयस्वाल यांच्याकडे मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

मनीषा म्हैसकर – मागील फडणवीस सरकारच्या काळात मनीषा म्हैसकर या नगर विकास विभागात कार्यरत होत्या. महाविकास आघाडी सरकार आल्यावरही त्यांचे महत्त्व कायम राहिले. आदित्य ठाकरे यांच्याकडील पर्यावरण आणि राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली. आता नव्या सरकारमध्ये मनीषा म्हैसकर यांच्यावर काय जबाबदारी येते याबाबत नोकरशाहीत तर्कवितर्क सुरू आहेत.

दीपक कपूर – मागील फडणवीस सरकारच्या काळात दीपक कपूर हे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे महासंचालक म्हणून काम करत आहेत. नव्या सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती होऊ शकते.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In new government of devendra fadnavis administration will have these administrative officers print politics news asj

ताज्या बातम्या