आसाराम लोमटे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र राहा’ असे पक्षनेतृत्वाने सांगितल्यानंतरही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी थांबली नसल्याचे चित्र आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रम घेण्याचा धडाका सुरू झाला खरा, पण सर्व नेते एकाच व्यासपीठावर हे चित्र अजून तरी दिसायला तयार नाही. सोनपेठ येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमास पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांची अनुपस्थिती राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर आणि बाबाजानी यांच्यातील मतभेद यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले. गेल्याच आठवड्यात शुक्रवारी (दि.४) गंगाखेड येथे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी घेतलेल्या कार्यक्रमास विटेकर यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. सध्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची दोन गटात विभागणी झाल्याचे चित्र आहे.

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Rashtriya Janata Dal Lalu Prasad Yadav Muslim-Yadav Loksabha Election 2024 RJD Bihar List
मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
war Of words between amol kolhe and shivajirao adhalrao patil over shirur lok sabha constituency
शिवाजीराव आढळरावांच्या ‘राष्ट्रवादी’तील प्रवेशानंतर ‘शिरूर’मध्ये आता शब्दिक युद्ध

गेल्या महिन्यात २७ मे रोजी खासदार श्रीमती सुळे या परभणी दौऱ्यावर होत्या. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील कर्णबधीर व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत श्रवणयंत्र तपासणी व वितरणाचा कार्यक्रम सकाळी पार पडल्यानंतर दुपारी आणखी काही कार्यक्रम श्रीमती सुळे यांच्या उपस्थितीत पार पडले. परभणीतील पत्रकार बैठक आटोपुन श्रीमती सुळे या पोखर्णी मार्गे सोनपेठकडे रवाना झाल्या. विटेकर यांनी सोनपेठ येथे बालविवाह प्रतिबंध जनजागृती अभियान, महिला परिषद व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमास पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार श्रीमती फौजिया खान, माजी खासदार सुरेश जाधव, परभणीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख आदी हजर होते. मात्र,पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या बाबाजानी यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. विशेष म्हणजे दिवसभरातल्या आधीच्या सर्व कार्यक्रमांना बाबाजानी यांनी हजेरी लावली होती.            

विटेकर विरूध्द बाबाजानी

गेल्या काही महिन्यापासून विटेकर विरूध्द बाबाजानी असा संघर्ष राष्ट्रवादीत सुरू आहे. दोन-अडीच महिन्यांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत सर्व स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलावून समज दिली होती. दिल्लीत झालेल्या बैठकीस खासदार श्रीमती खान यांच्यासह बाबाजानी, विजय गव्हाणे, विजय भांबळे, मधुसूदन केंद्रे, प्रताप देशमुख, राजेश विटेकर, भरत घनदाट हे उपस्थित होते. बाबाजानी यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातील अंतर्गत कलह समोर आला होता. श्रीमती खान यांनी पुढाकार घेत दिल्ली येथे बैठक घडवून आणली होती.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही किंतुपरंतु जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये शिल्लक राहू नयेत यासाठी पवारांनी तब्बल दोन तास या सर्वांना एकीचा कानमंत्र दिला होता. परस्परांविषयी असलेल्या मतभेदाचे मुद्देही मोकळेपणाने सांगून टाका असे पवारांनी या सर्वांना बजावले होते. मात्र,अजूनही राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष पूर्णपणे थांबलेला नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून बाबाजानी व विटेकर यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू झाला. राष्ट्रवादीच्या संचालकांनी महाविकास आघाडीसोबत जावे असा पक्षादेश असताना बाबाजानी यांनी या आदेशाला छेद देणारी भूमिका घेतली. तेथून या वादाची ठिणगी पडली. सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांचा राष्ट्रवादी प्रवेश करण्यात विटेकर यांचा मोठा वाटा होता. विशेष म्हणजे राठोड यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल बाबाजानी यांना कोणतीच खबरबात नव्हती. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला ते जिल्हाध्यक्ष असूनही अनुपस्थित होते.            

काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सोनपेठ येथील एका इमारतीसंदर्भात बाबाजानी यांनी तक्रार दिली होती. जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना बाबाजानी यांनी ही तक्रार दिलीच कशी याबाबत आश्चर्य व्यक्त झाले. त्यानंतर बाबाजानी व विटेकर यांचे मतभेद आणखीच वाढले. पवारांनी घेतलेल्या बैठकीनंतर सर्वकाही अलबेल होईल असे वाटत असतानाच विटेकरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या बाबाजानी यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. पाठोपाठ केंद्रे यांनी गंगाखेड येथे जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला विटेकर गैरहजर होते. यानिमित्ताने राष्ट्रवादीतला पक्षांतर्गत संघर्ष पूर्णपणे मिटला नसल्याचेही चित्र स्पष्ट झाले.

परभणीत ध्वजारोहणाचे दोन कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी राष्ट्रवादी भवनात पत्रकार बैठक पार पडली. यावेळी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. या बैठकीलाही शहरातील सर्व पदाधिकारी एकत्रितरीत्या उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त जे ध्वजारोहण पार पडले त्यातही दुफळी दिसून आली. वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी भवनात खासदार श्रीमती फौजिया खान, कार्याध्यक्ष किरण सोनटक्के, माजी खासदार सुरेश जाधव यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले तर शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या हस्ते क्रांती चौकात ध्वजारोहण पार पडले. महापालिकेचे नगरसेवक, शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.