-आसाराम लोमटे परभणी जिल्ह्यात सर्व प्रमुख राजकीय पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत गुंतलेले असताना राज्यात सत्तांतर झाल्याने अनेकांची समीकरणे उलटी- सुलटी झाली आहेत. विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या अस्वस्थता असून सत्ता हातची गेल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. शिवसेनेतील सत्तासंघर्षात ‘धनुष्यबाण’ ही निवडणूक निशाणी कोणाकडे राहणार यावरही शिवसेनेची स्थानिक पातळीवरची पुढची गणिते अवलंबून आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका या सर्वच निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात पक्षांतरेही झाली होती. दीर्घकाळ काँग्रेस पक्षात राहिलेले सोनपेठ येथील माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. जिल्ह्यात पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असल्यामुळे कार्यकर्त्यांनी असे निर्णय घेतले होते. गंगाखेडचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. परभणी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रताप देशमुख यांची शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. राज्यातल्या सत्तांतराने स्थानिक नेत्यांची घडी विस्कटली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी असली तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या पातळीवर मोर्चेबांधणी चालवली होती. जिल्हा परिषदेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी राजेश विटेकर, विजय भांबळे यांची तयारी चाललेली होती आणि शिवसेनेचेही आडाखे बांधले जाऊ लागले होते. पक्षांतर्गत गटबाजी असतानाही आपापल्या कार्यक्षेत्रात पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न चालले होते. जिल्ह्यात सेलू, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, मानवत, सोनपेठ, पूर्णा आदी ठिकाणच्या पालिका निवडणुकांसाठी स्थानिक नेत्यांनी प्रभागनिहाय हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र राज्यातल्या सत्तांतराने स्थानिक नेत्यांची घडी विस्कटली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मोर्चेबांधणीला खीळ बसली आहे. शिवसेनेतही सध्या अस्वस्थता - शिवसेनेतही सध्या अस्वस्थता पाहायला मिळत आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील यांनी आपण पक्षासोबत असल्याचे जाहीर केले असले, तरी सेनेत आणखी काय-काय घडामोडी घडतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागलेले आहे. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. जिल्ह्यात 'धनुष्यबाण' या निवडणूक निशाणीवर अनेकांचे राजकीय आयुष्य पालटले आहे. मात्र सेनेची निवडणूक निशाणी असलेला 'धनुष्यबाण' आता कोणाच्या हाती जाणार यावरही अनेक कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. .या प्रश्नाचे उत्तरही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच दडलेले होते - महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचे का, या मुद्यावर सेनेत दोन मतप्रवाह होते. एक मतप्रवाह काँग्रेससोबत, तर दुसरा मतप्रवाह राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या मनस्थितीत असतानाच राज्यात मोठा फेरबदल झाला. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र आहे. दोन्ही काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या-त्या ठिकाणी जी गणिते जुळवली होती, ती पूर्णपणे विस्कटली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे पालकमंत्रीपद होते. जिल्हा वार्षिक आराखड्याच्या निधीवाटपात कोणत्या ठिकाणी किती निधी द्यायचा या प्रश्नाचे उत्तरही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच दडलेले होते. आपापल्या कार्यक्षेत्रातील विकास कामे म्हणजे आगामी निवडणुकांसाठी केलेली गुंतवणूक, याच हिशेबाने दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले होते. सरकार गेल्याने दोन्ही काँग्रेससह शिवसेनेच्या ठाकरे समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.