हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : कर्जत खालापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी सुरेश लाड हे पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर असल्याचे दिसून येत आहे. कर्जत येथील खांडपे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधाकर घारे यांनी आयोजीत बैलगाडी स्पर्धांना हजेरी लावले टाळले आहे. त्यामुळे लाड पुन्हा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या रायगड दौऱ्या दरम्यान सुरेश लाड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर कार्यकर्ता संवाद मेळाव्यांपासून ते अलिप्त राहीले होते. लाड भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या यावेळी उठल्या होत्या. काहीकाळ ते अज्ञातवासातही गेले होते. मात्र खासदार सुनील तटकरे यांनी त्यांची मनधरणी केली. त्यानंतर लाड यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत आपण पक्षातच राहणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र याच वेळी पक्षाच्या कार्यकारणीने त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर करून घेतला होता. रोह्याच्या मधुकर पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.

हेही वाचा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दलच राज ठाकरे यांनी उपस्थित केला सवाल

यावेळी कोंढाणे धरणाचे पाणी कर्जतला मिळावे, ते धरण सिडकोच्या ऐवजी राज्याच्या जलसंपदा विभाग्याने ताब्यात घ्यावे अशी भुमिका लाड यांनी मांडली होती. दोन वर्ष मागणी करूनही तत्कालिन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यासंदर्भात निर्णय न घेतल्याने आपण नाराज असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर लाड यांच्या नाराजीनाट्यावर पडदा पडला होता. मात्र यानंतरच्या काळातही लाड हे पक्षाच्या कार्यक्रमात फारसे सक्रीय दिसून आलेले नाही. यास मतदारसंघात सुधाकर घारे यांचा वाढता प्रभाव कारणीभूत असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा… कृषीमंत्र्यांच्या अंधारातील धावत्या दौऱ्याने शेतकरी नाराज

लाडांच्या नाराजी नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले आहे. घारे हे आमदार अनिकेत तटकरे आणि अदिती तटकरे याच्या विशेष मर्जीतील आहेत. घारे यांचा पंक्षातर्गत वाढणारा प्रभाव हा लाड यांच्यासाठी असुरक्षितेची भावना निर्माण करतो आहे. लाड यांना डावलून पक्षाकडून घारे यांना पुढे केले जात असल्याचे चित्र मतदारसंघात निर्माण झाले आहे. ही असुरक्षितेची भावना कुठेतरी लाड यांच्या नाराजीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे सुधाकर घारे यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी स्पर्धाना जाणे लाड यांनी टाळले असल्याचे राजकीय वर्तूळात बोलले जात आहे. लाड यांनी यासंदर्भात मौन बाळगणे पसंत केले असले तरी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार अदिती तटकरे यांची उपस्थिती असलेल्या स्पर्धापासून लाड का दूर राहीले का दूर राहीले असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे लाड पुन्हा नाराज तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. लाड यांनी सध्यातरी यासंदर्भात मौन बाळगणे पंसंत केले आहे.

हेही वाचा… सांगलीचे राजकारणही प्रदूषित?

कोण आहेत सुरेश लाड….

सुरेश लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. त्यांनी कर्जत खालापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. यातील तीन वेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते. गेल्या निवडणूकीत मात्र त्यांचा शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांनी पराभव केला होता. मराठा समाजाचे प्रतिनिधत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. कोँढाणे धरणाच्या उंची वाढवा अशी मागणी करण्याचे पत्र त्यांनीच दिले होते. यानंतर जलसिंचन घोटाळ्याची राळ पहिल्यांदा उठली होती. उपजिल्हाधिकारी याला मारहाण केल्याचे त्यांचे प्रकरणही बरेच गाजले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In raigad former ncp mla suresh lad is again upset print politics news asj
First published on: 23-03-2023 at 11:38 IST