scorecardresearch

Premium

कोकणात राणे बंधू विरुद्ध सामंत बंधू संघर्ष अटळ

कुडाळ तालुक्यातील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना चव्हाण यांनी नीलेश राणे यांची उमेदवारी जाहीरच करुन टाकली. तर आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भय्या सामंत यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Ratnagiri, sindhudurg districts, clashes, Rane brothers, Uday Samant, politics
कोकणात राणे बंधू विरुद्ध सामंत बंधू संघर्ष अटळ ( छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

सतीश कामत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे माजी आमदार नीलेश राणे यांची उमेदवारी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केल्यामुळे कोकणात राणे बंधू विरुद्ध सामंत बंधू, असा राजकीय संघर्ष अटळ झाला आहे.

Chandrashekhar Bawankule (1)
इस्लामपुरचा भावी आमदार भाजपचाच- बावनकुळे
Ajit Pawar group washim
वाशिम : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात नाराजीनाट्य! सहकारमंत्र्यांच्या समोरच…
dhairyashil mane
धैर्यशील माने यांना भाजपच्या उमेदवारीचे वेध? 
Unmesh Patil - ujjwal nikam
भाजपा उज्ज्वल निकमांना जळगावातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? विद्यमान खासदार उन्मेश पाटील म्हणाले…

कुडाळ तालुक्यातील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना चव्हाण यांनी नीलेश राणे यांची उमेदवारी जाहीरच करुन टाकली. ‘कुडाळचे पुढचे आमदार नीलेश राणे असतील. तुम्ही त्यांना साथ द्या’, असे थेट आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. भाजपा पक्षश्रेष्ठींनी यावर शिक्कामोर्तब केले तर आगामी विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून विद्यमान आमदार नीतेश राणे, तर शेजारच्या कुडाळमधून त्यांचे थोरले बंधू नीलेश हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव रिंगणात दिसणार आहेत. यापैकी नीतेश यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल, हे अजून अनिश्चित असले तरी कुडाळमध्ये नीलेश यांचा सामना उध्दव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आणि राणे कुटुंबाचे परंपरागत राजकीय वैरी वैभव नाईक यांच्याशी होणार आहे. यामध्ये नीलेश विजयी झाले तर त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यावर पुन्हा एकवार राणेंची पकड मजबूत होईल. पण ही लढत तितकी सोपी नाही, असे जाणकारांचे मत आहे.

हेही वाचा… कसब्याच्या पराभवाचा भाजपने घेतला धसका, पुण्यात बैठकांचा सपाटा; पुढील आठवड्यात रा. स्व. संघाची महत्त्वाची बैठक

अर्थात या जिल्हा पातळीवरील राजकीय चित्रापेक्षा या निमित्ताने रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाराला येत असलेले राजकीय चित्र जास्त व्यापक आणि दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमधून सतत चढता राहिला आहे आणि यामध्ये त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भय्या सामंत यांची भूमिका अतिशय मोलाची राहिली आहे. या दोन्ही बंधुंनी राणेंचा रत्नागिरी जिल्ह्यात कधीच जम बसू दिलेला नाही. उलट, आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भय्या सामंत यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात तर स्वतः उदय सामंत यांनी, भय्या सामंत लोकसभा निवडणुकीत उतरले तर त्यांना साडेतीन लाख मतांनी विजयी करु, असे जाहीर वक्तव्य केले आहे. स्वतः भय्यांनी मात्र, तूर्त या विषयावर सावध पवित्रा घेतला आहे. पण मागील लोकसभा -विधानसभा निवडणुकांपर्यंत पडद्यामागचे सूत्रधार, ही भूमिका मन:पूर्वक निभावणारे भय्या गेल्या चार वर्षांत हळूहळू उघडपणे राजकीय व्यासपीठावर वावरु लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबतसुध्दा त्यांनी तशी शक्यता नि: संदिग्ध शब्दात फेटाळून न लावता, याबाबत निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे. कारण तो निर्णय घेण्यापूर्वी या जागेवर शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा, हे दोन्ही सत्ताधारी पक्षाचे नेते हक्क सांगत असल्याने जागा वाटपात हा मतदारसंघ कोणाला, हे आधी ठरवावे लागणार आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडे तो आला तर सामंतांची वाट सोपी आहे. पण केंद्रात निर्विवाद सत्तेसाठी या निवडणुकीत स्वतःचे बळ जास्तीत जास्त वाढवू इच्छिणाऱ्या भाजपाने तो स्वतःकडे खेचून घेतला आणि तरीही सामंतांना निवडणूक लढवायची असेल तर भाजपाच्या तंबूचा आसरा घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. भाजपाकडून राणे पिता-पुत्र आणि या जागेसाठी बाशिंग बांधून बसलेले त्यांचे निष्ठावान माजी आमदार प्रमोद जठार अशा डावपेचांना कडाडून विरोध करतील, हे उघड आहे. पण हल्ली उमेदवार निवडताना, ‘जिंकून येण्याची क्षमता’ हा सर्वच राजकीय पक्षांचा सर्वोच्च निकष झाला आहे आणि त्यामध्ये भाजपाच्या, इतर कोणाही इच्छुकापेक्षा भय्या सामंतांचे पारडे जड आहे.

हेही वाचा… शिवसेनेच्या पालकमंत्र्याच्या विरोधात ठाण्यात भाजप आमदारांमध्ये असंतोष, बैठकांना पालकमंत्र्यांना वेळच नाही

अशा दोनपैकी कुठल्याही प्रकारे भय्यांना उमेदवारी मिळाली तर आत्तापर्यंत मुख्यतः रत्नागिरी जिल्ह्यापुरता सीमित असलेला सामंत बंधुंचा वारु सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाल करुन जाणार आहे आणि स्वतःचे राजकीय भवितव्य शाबूत राखण्यासाठी तो अडवण्याचा आटापिटा राणे बंधू करणार, हे उघड आहे. अर्थात यामध्ये त्यांना मर्यादा आहेत. तरीही त्यांनी प्रयत्न केल्यास भाजपा पक्षश्रेष्ठींनी डोळे वटारले की विरोधाचे निशाण गुंडाळावे लागणार आहे. कारण, जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याच्या धोरणाविरोधात पक्षश्रेष्ठी कोणालाही आड येऊ देणार नाहीत. शिवाय, तसेही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने उदय सामंत आणि रत्नसिंधु योजनेचे सदस्य या नात्याने भय्या सामंतांचा त्या जिल्ह्यात शिरकाव झालेला यापूर्वीच आहे. याउलट, नीतेश यांचा प्रभाव कणकवली तालुक्याबाहेर फारसा नाही, तर लोकसभेच्या लागोपाठ दोन निवडणुकांमधील पराभवांनंतर नीलेश यांचा राजकीय आलेख खूपच घसरलेला आहे. एके काळी आक्रमक राजकारण आणि प्रशासनावर उत्तम पकड, या दोन महत्त्वाच्या गुणांच्या आधारे राजकीय आखाडा गाजवलेले पिताजी नारायण राणे उतरत्या काळात भाजपा पक्षश्रेष्ठींच्या कृपेने राजकीय पत सांभाळून आहेत. शिवाय दोन्ही बंधू जाहीर अर्वाच्य वक्तव्ये आणि दांडगाईसाठी प्रसिद्ध आहेत. त्या तुलनेत सामंत बंधू उल्लेखनीय सार्वजनिक सभ्यता आणि सुसंस्कृतपणा बाळगून आहेत.

हेही वाचा… कोल्हापूरमधील शरद पवार की अजित पवारांची सभा मोठी होणार ?

यापैकी काहीच झाले नाही आणि भय्या सामंतांना २०२९ साठी वाट पाहण्याची वेळ आली तरी यापुढील काळात सामंत बंधू केवळ रत्नागिरी जिल्ह्यात एकछत्री अंमल निर्माण होण्यावर समाधानी राहण्याची शक्यता नाही. स्वतःला ‘कोकणचे’ भाग्यविधाते म्हणवणाऱ्या नारायण राणेंना त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वीपणे रोखले आहे. शिवाय, इथे त्यांना जिल्हा पातळीवर टक्कर देऊ शकेल, असे राजकीय नेतृत्व कोणत्याही पक्षामध्ये दिसत नाही. शिवाय, पिताजी रवींद्र उर्फ अण्णा सामंतही गरजेनुसार दुसरी/तिसरी फळी सांभाळण्याची जबाबदारी उत्तम प्रकारे निभावत असतात. त्यामुळे आता सामंत बंधू सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ‘साम्राज्यविस्तारा’ची स्वप्ने पाहत असल्यास नवल नाही. त्याच दृष्टीने भय्या सामंतांच्या उमेदवारीची चर्चा सुरु करुन दिलेली आहे. अशा परिस्थितीत इथे राणे बंधू विरुद्ध सामंत बंधू, असा राजकीय संघर्ष अटळ होत जाणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In ratnagiri sindhudurg districts clashes between rane brothers and uday samant is inevitable in politics print politics news asj

First published on: 08-09-2023 at 11:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×