रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभेच्या जागेबरोबर चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी माजी आमदार रविंद्र माने यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने व राजेंद्र महाडिक हे इच्छुकांच्या यादीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी सध्या तीन जणांची नावे समोर येत असून या तिघांपेकी कोणाला मातोश्रीमधून उमेदवारी मिळणार याकडे आता लक्ष लागले आहे. संगमेश्वर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी देवरुख येथील मराठा भवनमध्ये घेण्यात आली. याबैठकीत शिवसैनिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. याबरोबर चिपळुणातील कार्यकर्त्यांनीसुद्धा रोहन बनेंच्या नावाला पाठिंबा देत पसंती दर्शवली आहे. या मेळाव्यामध्ये सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी देखील आपण इच्छुक असल्याचे स्पष्ट केले होते.

हेही वाचा – शिंदे गटाकडे दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे यांचे लक्ष्य भाजपच

हेही वाचा – कारण राजकारण: धार्मिक ध्रुवीकरण साटम यांना बाधणार?

मराठा भवन येथे झालेल्या बैठकीत माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी देखील संगमेश्वर तालुक्यामधून ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सांगितले आहे. गेली अनेक वर्षे संगमेश्वर तालुक्याचा आमदार होऊ न शकल्यामुळे विकास कामे म्हणावी तशी झाली नाहीत. त्यामुळे तालुक्याचा विकास करायचा असेल तर तालुक्यातीलच भावी आमदार असावा असा निश्चय या बैठकीतील शिवसैनिकांनी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. मात्र संगमेश्वर-चिपळूण विधानसभेसाठी इच्छुकांची नावे वाढत असल्याने मातोश्रीवरून कोणाला कौल मिळणार ? आणि कोणाची नाराजी पत्कारावी लागणार ? याकडे लक्ष लागले आहे. रत्नागिरी पाठोपाठ या चिपळूण – संगमेश्वर विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून अनेक लोक उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला आघाडी मिळाली होती. यामुळेच ठाकेर गटात इच्छुकांची संख्या वाढली आहे.