सांगली : विधानसभा निवडणुकीत झालेल्या नामुष्कीजनक पराभवानंतर जिल्ह्यातील आठही जागा लढविण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाची सुरू असून महाविकास आघाडीत जागा वाटपात खानापूर-आटपाडीसह सांगली व मिरज मतदार संघावर हक्क सांगण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी ताकद नसताना अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी अवस्था झालेली असतानाही आताही तोच कित्ता शिवसेनेकडून राबविला जाण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा मतदार संघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेला ६० हजार ८६० मतदान झाले. महाविकास आघाडीची उमेदवारी असताना झालेले मतदान अपक्ष उमेदवाराच्या तुलनेत अत्यंत कमी मतदान झालेले आहे. उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यावर निवडणुकीतील अनामतही गमविण्याची वेळ आली. मतदार संघातील एकाही ग्रामपंचायतीची सत्ता नाही, साधा सदस्य नाही, महापालिका क्षेत्रातही संघटनेची ताकद तोळामासाच असताना आताही पुन्हा हाच खेळ ना पक्षाला परवडणारा ना मविआला पचणारा अशी स्थिती आहे.

नुकत्याच मुंबईत झालेल्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सर्व मतदार संघामध्ये स्वबळावर लढण्याची वेळ आली तर तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर महाविकास आघाडी लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आलीच तर खानापूर-आटपाडी, मिरज आणि सांगली या तीन मतदार संघाची मागणी करण्याचा निर्णय झाला आहे. या दिशेने आमची तयारी असल्याचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी सांगितले. यापैकी खानापूर-आटपाडी हा मतदार संघ हा स्व. अनिल बाबर यांचा आहे. त्यांनी गत निवडणुक शिवसेनेच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात ते सामील झाले होते. यामुळे या ठिकाणचा बाबर गट शिवसेना शिंदे गटात आहे. मात्र, मूळची ही जागा शिवसेनेची असल्याने मविआमधून ही जागा शिवसेनेला सोडली जाईल असे दिसते. तरीही सांगली व मिरज मतदार संघावर उबाठा शिवसेनेचा दावा अनालकनीय आहे. या ठिकाणी सध्या भाजपचे प्रतिनिधीत्व असल्याने या जागा उबाठा शिवसेनेला हव्या आहेत. म्हणजे पुन्हा लोकसभेप्रमाणे कोल्हापूरच्या बदली सांगली असाच हा दावा म्हणता येईल.

हेही वाचा… पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यास केव्हापासून सुरुवात झाली? युतीच्या राजकारणाचा काय आहे इतिहास?

मविआतील जागा वाटपाची बोलणी अद्याप प्राथमिक पातळीवर असली तरी जिल्ह्यातील शिवसेनेने लोकसभा निवडणुकीतील निकालाने काहीच धडा घेतला नाही असेच म्हणावे लागेल. उपर्‍या उमेदवारीवर पक्षाचा विस्तार होणार कसा याचाही विचार करायला हवा. लोकसभेवेळी ऐनवेळी पक्षात प्रवेश देउन उमेदवारांना मैदानात उतरविण्यात आले. तशीच गत यावेळीही करण्याची ठाकरे शिवसेनेची खेळी अंगलट येण्याचीच शक्यता आहे. कारण इच्छाशक्ती आणि जनतेचा रागरंग बघून लोकसभेला जसा सांगली पॅटर्न यशस्वी झाला त्याच धर्तीवर पुन्हा विधानसभा निवडणुकीतही सांगली पॅटर्न राबविला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खानापूर-आटपाडी हा नैसर्गिक मतदार संघ आणि मिरज हा शिवसेनेचा पारंपारिक मतदार संघ असल्याचा दावा उबाठा शिवसेनेकडून केला जात आहे. पैलवान पाटील यांनीही या दोन मतदार संघावर शिवसेनेचा दावा असल्याचे सांगितले आहे. मिरज मतदार संघामध्ये २०९९पासून भाजपकडे प्रतिनिधीत्व आहे. राखीव मतदार संघामध्ये तुल्यबळ उमेदवारही पक्षाकडे शोधावा लागणार आहे. तर खानापूरमध्ये बाबर गटाला तोडीस तोडीस उमेदवार सध्या तरी नाही. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांना पक्षात येण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. म्हणजे आयात उमेदवारीवरच शिवसेना विसंबुन राहणार का असाही सवाल उपस्थित होतो. मग लोकसभेप्रमाणे सांगली पॅटर्न पुन्हा उभा ठाकला तर नवल ते काय?