दिगंबर शिंदे

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगली दौर्‍यामध्ये सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेच रस दाखवला. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी विट्याला भेट दिली. मात्र नियोजित दौर्‍यामध्ये कार्यक्रम निश्‍चित नसताना मुख्यमंत्री शिंदे यांची भारती विद्यापीठास भेट, काँग्रेसने केलेले आदरातिथ्य, रस्त्यावर का असेना राष्ट्रवादीच्या महापौरांनी केलेले स्वागत या पार्श्वभूमीवर भाजपकडून केले गेलेले थंडे स्वागत सर्व काही अलबेल आहे का याबाबत शंका उत्पन्न करणारे आहे.

आ. बाबर यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले. मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूरच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. या दौर्‍यातच त्यांनी आ. बाबर यांच्या घरी सांत्वनासाठी भेट निश्‍चित केली होती. या दरम्यानच, आदल्या रात्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातीचे अकाली निधन झाले. मुख्यमंत्र्यांनी वसंत बंगल्यावर जाउन माजी केंद्रिय मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली. ही महाराष्ट्राची संस्कृती असल्यामुळे त्यात राजकारण पाहण्याचे कारण नसले तरी भारती विद्यापीठाला भेट देऊन माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्याशी केलेली गुप्त चर्चा शंका निर्माण करणारी ठरली आहे. याच ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केलेला सत्कार बरेच काही सांगून जाणारा आहे. तर भाजपला सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडून राष्ट्रवादीतून महापौर झालेल्या दिग्विजय सूर्यवंशी यांनी कॉलेज कॉर्नरवर ताफा अडवून मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले. राज्यमंत्री कदम हे आमचेच आहेत. भारती विद्यापीठाला भेट दिल्यानंतर कोणी काहीही राजकीय अर्थ काढला तरी पर्वा नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री हे राज्याचे नेते असल्याने त्यांचे स्वागत करण्यात आणि भेट घेण्यात गैर ते काय? याचा राजकीय अर्थ काढण्यात अर्थ नाही असे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगत एकप्रकारे समर्थन केले.

हेही वाचा… फडणवीसांचे विश्वासू संजय कुटे यांना मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदाचीही हुलकावणी

तासगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच पुढे होते. आर. आर. आबांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील यांची बाजार समितीमध्ये त्यांनी आवर्जून भेट घेतली. आबांच्या पुतळ्याला अभिवादन करत मुलगा रोहित पाटील याला काहीही काम असेल तर थेट फोन कर असे सांगितले.

सांगली, मिरज हे दोन्ही मतदार संघ भाजपकडे आहेत, खासदार भाजपचे आहेत. तरीही भाजपच्या मदतीनेच सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी सांगलीच्या आमदार सुधीर गाडगीळ आणि काही मोजक्या कार्यकर्त्यांनी केवळ औपचारिकता पार पाडली. यावेळी काँग्रेसने मागण्यांचे निवेदन महापालिकेतील गटनेते संजय मेंढे यांच्या हस्ते दिले. मात्र, सांगलीच्या प्रश्‍नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधावे असे आमदार या नात्याने गाडगीळ यांना गरजेचे वाटले नाही. मूळात भाजपच्या मदतीने राज्यात झालेला सत्ताबदल आणि मंत्रिमंडळच भाजप कार्यकर्त्यांना अद्याप पचनी पडलेले नसावे. जिल्ह्यातील मंत्री या नात्याने कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी राजशिष्टाचार म्हणून तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौर्‍यात असायला हवे होते, तेही दिसले नाहीत. मात्र, मंत्री खाडे यांच्या स्वागताला झाडून भाजपची मंडळी आवर्जून उपस्थित होते एवढेच नव्हते, तर ध्वनिवर्धकाच्या तालावर नाचण्यासाठी सगळे रस्त्यावरही उतरले होते.