सांंगली : डोययावर रणरणतं अंग भाजून काढणारं उन्हं. रस्त्यावर सावली शोधावी म्हटलं तर मेंढरानं ओरबाडलेली खुरटी झुडप. मग सावलीचा पत्ता नाही, तर चिमणी प्यायला पाणी कुठलं अशी अवस्था जत पूर्व भागातील अनेक गावांची आणि वाडीवस्तीवरची झालेली. अशात लोकसभेचं रणमैदान मात्र तुफान गाजू लागलं आहे ते वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनी. गेले पंधरा दिवस उमेदवार अनिश्‍चित असताना आणि आता युध्दात आमने-सामने कोण आहे हे स्पष्ट झाल्यानंतर. कुणाच्या खिशात सातबारा कायम असतात इथंपासून ते आशिया खंडातील साखर कारखाना कुणी मोडला, भावाला राजकीय संन्यास का घ्यावा लागला, कोर्टकचेरीत अडकलेल्या जमिनीची स्वस्तात खरेदी करून त्याची भरमसाठ दराने तुकड्याने विक्री करणार्‍याचे धंदे असे आरोप एकमेकावर अंतिम लढ्यात होउ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली लोकसभेच्या आखाड्यात विद्यमान खासदार संजयकाका पाटील, वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील असा तिरंगी सामना लक्ष्यवेधी ठरत आहे. यंदाची निवडणुक गाजली आणि वाजली ती महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरूनच . भाजपने पहिल्या यादीतच विद्यमान खासदारांना सांगलीची उमेदवारी घोषित केल्याने प्रचारासाठी अन्य उमेदवारांच्या तुलनेत अधिक वेळ मिळाला. यामुळे भाजपचा प्रचार गाव पातळीपर्यंत पोहचविण्यात महायुतीला यश आले. मात्र, मविआची उमेदवारी उबाठा शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली तरी काँग्रेसच्या प्रबळ दाव्यामुळे प्रचार हात राखूनच होता. अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत उमेदवारीचा तराजू हेलकावत होेता. धड काँग्रेसला ना धड शिवसेनेला ताकदीने मैदानात उतरता आले नाही. याचा फायदा भाजपला मात्र, घेता आला नाही. कारण प्रबळ उमेदवार मैदानात उतरतो की नाही अशी शंका होती. तथापि, अखेरच्या टप्प्यात विशाल पाटील यांनी मैदानात उतरत असतानाच विद्यमान खासदारांवर नाराज असलेल्या मंडळींना सोबत घेउन रणशिंग फुंकले आणि त्यानंतरच खर्‍या अर्थाने आखाड्या भोवती हालगी, कैताळ आणि घुमकीच्या रूपाने आरोप-प्रत्यारोपाचे फटाके फुटू लागले.

हेही वाचा : ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात, काँग्रेसकडे देशाला देण्यासारखं काही राहिलेलं नाही

देशपातळीवर महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष पाहण्यास मिळत असताना सांगलीत मात्र, महायुती विरूध्द अपक्ष असाच सामना अधिक रंगतदार बनू लागला आहे. अपक्षाकडून होत असलेल्या आरोपाला प्रतिहल्ला करतांना खासदारांडून केवळ विशाल पाटील यांनाच लक्ष्य केले जात आहे. उमेदवारी दाखल करत असतानाच खासदारांनी विशाल पाटील म्हणजे माझ्यापुढे लहान असून राजकीय अपरिक्वता असल्याचे सांगत वात लावली. त्यांचा लढा म्हणजे घराण्याची अस्मिता असल्याचे सांगत वसंतदादा साखर कारखाना, भारत सूत गिरणी, मका व शाबू प्रकल्प, कृषी संशोधन केंद्र याचे काय झाले असे सवाल करत घराण्यालाच लक्ष्य केले आहे. तर म्हैसाळ योजनेचे श्रेय घेउन मतदारांची फसवणूक करणार्‍या खासदारांना घरी बसविण्याची वेळ आली असल्याचे सांगत विशाल पाटील यांनीही यशवंत, तासगाव कारखान्याची अवस्था काय असा सवाल केला. आता मात्र दोघांनीही महाआघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यावर अवाक्षरही टीका टिपणी केल्याचे दिसून येत नाही. यातून हा लढा महायुती विरूध्द महाआघाडी असा न होता, भाजप विरूध्द अपक्ष असा वैयक्तिक पातळीवरच केंद्रित झाल्याचे निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli lok sabha bjp sanjaykaka patil independent candidate vishal patil personal disputes in campaigning print politics news css