सांंगली : सांगली लोकसभेसाठी यावेळी तिरंगी लढत होत असून अंतिम टप्प्यात भाजप विरूध्द अपक्ष असाच सामना रंगतदार पातळीवर पोहचला आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यात होत असलेल्या चुरशीच्या लढतीला महाविकास आघाडीतील शिवसेनेचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची किनार लाभली असल्याने अत्यंत उत्कंठावर्धक स्थितीत ही निवडणूक पोहचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रारंभीच्या काळात निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच भाजपचे सांगलीतील उमेदवार विद्यमान खासदार पाटील यांना जाहीर झाली. यामुळे खा. पाटील यांना गावपातळीवर पोहचण्यात आणि गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाची माहिती लोकापर्यंत पोहचविण्यात बराच मोठा वेळ मिळाला. सहा विधानसभा मतदार संघ असलेल्या सांगली लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीकडे मिरज, सांगली व खानापूर-आटपाडी हे तीन मतदार संघ तर तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव आणि जत हे तीन मतदार संध आघाडीकडे आहेत. यामुळे पक्षिय पातळीवर आघाडी व युतीला समान संधी असली तरी राजकीय स्थिती मात्र मतदार संघनिहाय वेगवेगळी पाहण्यास मिळते.

हेही वाचा : मुस्लिमांनी मतदान केले म्हणूनच योगी आदित्यनाथ दोनदा मुख्यमंत्री; टीडीपीच्या उमेदवाराचे वक्तव्य

एकीकडे भाजपची उमेदवारी जाहीर झालेली असताना महाविकास आघाडीत उमेदवारीवरून संघर्ष उफाळून आला. काँग्रेसने सांगलीची जागा परंपरेने आमचीच आहे असे सांगत विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी माघारीच्या मुदतीपर्यंत आग्रही होते. अगदी दिल्लीपर्यंत धडक मारली. उमेदवारीवरूनच सांगलीची निवडणूक लढत लागण्यापुर्वीच गाजली. मात्र, काँग्रेसमधूनच अपक्ष उमेदवारी दाखल करत अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. ताकद नसताना सांगलीची उमेदवारी शिवसेनेला कशी मिळाली यावरूनच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याबाबत संशयाचे वातावरण तयार झाले. आणि त्यामुळे चिडीचे वातावरणही तयार झाले. यातून विशाल पाटील यांची उमेदवारी राजकीय कूटनीतीतून कापली गेल्याची भावना मात्र कायम राहिली. यातूनच अपक्ष उमेदवारीला पाठबळ मिळत गेले. यामुळेच सांगलीची निवडणूक अंतिम टप्प्यात चुरशीची होत गेली.

आता महविकास आघाडीचे नेते व्यासपीठावर एकत्र दिसत असले तरी बंडखोरीवर कारवाईची शिवसेनेने मागणी करूनही अखेरपर्यंत झालेली नाही. यावरून अप्रत्यक्ष अंतर्गत मदत अपक्षाला आहे का? आघाडी धर्माचे पालन केले जाणार का असे प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मुळात विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या मातब्बर राजकीय घराण्याच्या तिसर्‍या पिढीतील नेतृत्व आहे. त्यांना राजकीय वारसा जसा लाभला आहे तसा वारसा आघाडीचे पैलवान पाटील यांना नाही. यामुळेच त्यांच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते.

हेही वाचा : अमेठी, रायबरेली आणि वायनाडबाबतच्या निर्णयातून काँग्रेसला नेमके काय साधायचे आहे?

आता या गोष्टी इतिहासजमा झाल्या असल्या तरी मतदानावर याचा निश्‍चित परिणाम पाहण्यास मिळण्याची चिन्हे आहेत. त्यात गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची तीन लाख मते होती. यावेळी वंचित आघाडीने आपले वजन विशाल पाटील यांच्या पारड्यात टाकले आहे. याचाही परिणाम अपेक्षित आहे. भाजपचे खासदार पाटील यांची तळागाळापर्यंत आपलेपणाने खांद्यावर हात टाकून वैयक्तिक नावाने केली जाणारी विचारणा आणि तरूणांची शक्ती ही जशी जमेची बाजू आहे तशीच गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखाही त्यांना मदतीला येउ शकतो. यावेळच्या निवडणुकीत तब्बल २० उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे, स्वाभिमानीचे महेश खराडे हे अपवाद वगळता अन्य उमेदवार फारसे चर्चेत नाहीत. तरीही काही हजारात मतदान घेणारे असल्याने त्याचा फटका कोणाला बसतो आणि फायदा कोणाला होतो हे पाहणेही मनोरंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli lok sabha main contest between bjp sanjaykaka patil vs independent vishal patil print politics news css
First published on: 06-05-2024 at 10:47 IST