scorecardresearch

Premium

मिरजेत पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात ठाकरे गटात उमेदवारीवरून आतापासूनच संघर्ष

मिरज विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठीची मोर्चेबांधणी सुरू झाली असून आयात विरूध्द निष्ठावंत असा सामना आताच रंगू लागला आहे.

assembly election miraj news in marathi, suresh khade news in marathi, sangli guardian minister suresh khade
मिरजेत पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात ठाकरे गटात उमेदवारीवरून आतापासूनच संघर्ष (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सांगली : लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास अजून तीन महिने अवकाश असताना मिरज विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठीची मोर्चेबांधणी सुरू झाली असून आयात विरूध्द निष्ठावंत असा सामना आताच रंगू लागला आहे. राज्यातील निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाणार असल्याचे नेते सांगत असताना, अजून इंडियाची भूमिका लोकसभेसाठी निश्‍चित झालेली नसताना मिरजेत मात्र शिवसेना ठाकरे गटामध्ये उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष म्हणजे ‘बाजारात तुरी अन् नवरा बायकोला मारी’ अशीच गत म्हटली जात आहे.

मिरज विधानसभा मतदार संघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे. सध्या या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे आहे. जिल्ह्याचे पालकत्व आणि राज्याचे कामगार खाते त्यांच्याकडे असले तरी त्यांचे सारे लक्ष हे मतदार संघातच केंद्रित असते. मंत्री झाल्यापासून त्यांचा सर्वाधिक वेळ हा मतदार संघातच गेला आहे. अगदी गल्ल बोळातील पानटपरीच्या उद्घाटनापासून ते महत्चाच्या कार्यक्रमाला मंत्री या नात्याने त्यांची हजेरी असते. अगदी दिवाळीतील बङ्खे कंपनीच्या किल्ल्याला भेटी देण्यासही मंत्री महोदयांना पुरेसा वेळ मिळतो. मात्र, शहरातील रस्ते, भाजी मंडई, वाहतूक कोंडी एकमेव महामार्ग असलेला छत्रपती शिवाजी महाराज रस्ता या महत्वाच्या प्रश्‍नाकडे लक्ष देत असले तरी प्रश्‍न सुटल्याचे काही दिसत नाही. अशा स्थितीत प्रबळ विरोधकाची गरज मिरजकरांना सातत्याने भासत आहे. पक्षातूनही उमटत असलेली नाराजी आज जरी पेल्यातील वाद असला तरी त्याला फुलविण्याचे प्रयत्न केले तर निश्‍चितच सक्षम प्रतिनिधी मिरजेला मिळू शकतो. तशी इच्छा शक्ती विरोधकांची नाही ही वस्तुस्थिती आहे.

raju shetty
चावडी: मंडप सजलाय, पण नवरदेवाचाच पत्ता नाही !
Bansuri Swaraj
बांसुरी स्वराज यांना लोकसभेची उमेदवारी, ‘घराणेशाही’च्या मुद्द्यावरून विरोधकांकडून भाजपाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न!
Sangram Thopte
आमदार संग्राम थोपटे नक्की कोणासोबत ?
no alt text set
नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे विरुद्ध सारे

हेही वाचा : रोहित पवार यांच्या यात्रेत अमरावतीमध्ये महाविकास आघाडीतील एकजुटीचे चित्र

एकेकाळी मिरजमध्ये काँग्रेस आणि शिवसेना असा राजकीय संघर्ष होता. याच जोरावर मिरज राखीव मतदार संघ झाल्यानंतर शिवसेनेने अखेरच्या क्षणी मैदानात उतरून चांगली लढत दिली होती. आताही या मतदार संघावर हक्क सांगण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढविल्या जाणार असल्याचे वरिष्ठ नेते सांगत असल्याने मिरजेची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस की शिवसेना यापैकी कोणाला मिळते हे अजून स्पष्ट नाही. काँग्रेस वगळता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले आहेत. त्याचेही पडसाद या मतदार संघात उमटले असून दोन्ही पक्षात दोन्ही गटाचे पदाधिकारी आहेत. चुली वेगळ्या मांडल्या गेल्या असल्या तरी एक चूल काँग्रेस विचारांच्या साथीने तर दुसरी चूल सत्ताधारी भाजपच्या इंधनावर चालवली जाण्याची शक्यता अधिक दिसत आहे. राज्य स्तरावर पक्षिय गोंधळ दिसत असताना शहरातही पदाधिकार्‍यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे गोंधळात भर पडत आहे.

हेही वाचा : पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात स्वपक्षीयांचीही नाराजी !

काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढविणारे सिध्दार्थ जाधव यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. आता प्रवेश करीत असताना विधानसभेची उमेदवारी देण्याचा शब्द वरिष्ठांनी दिला की नाही हे शब्द देणार्‍यांनाच ज्ञात. मात्र शहरात वरिष्ठांनी तयारी करण्याचा आदेश दिला असल्याचे सांगत मिरज शहरात स्थानिक पदाधिकार्‍यांना सोबत घेउन सत्काराचा जंगी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमावर निष्ठावंत असलेल्या आणि २०१४ मध्ये शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढविलेल्या तानाजी सातपुते यांच्या मतांचा विचारच केला नाही. विधानसभा क्षेत्र प्रमुख असे पद असताना त्यांची या मेळाव्यातील गैरहजेरी शिवसेना ठाकरे गटात बेबनाव निर्माण झाल्याचेच निदर्शक मानली जात आहे. अगोदरच मतदार संघात शिवसेनेची ताकद तोळामासा झाली असताना हा बेबनाव भाजप विरोधात ठामपणे शक्ती उभी करण्यात अडसर ठरू शकते. मतदार संघात एकही ग्रामपंचायत ताब्यात तर दूरच पण एकही सदस्य नाही, पंचायत समिती, जिल्हा परिषद गटात स्वबळावर निवडून येण्यासारखी स्थिती सध्या तरी नाही. मग कसा हा पक्ष विस्तारणार?

हेही वाचा : कन्या प्रणितीसाठी सुशीलकुमार शिंदे झाले सक्रिय !

मुळात लोकसभा निवडणुकीनंतर राज्य पातळीवरील राजकीय समिकरणे कशी असतील याचा अंदाज आजच्या घडीला कोणी राजकीय निरीक्षकही ठामपणाने मांडू शकत नाही. राष्ट्रवादी, शिवसेना यामधील दोन गट सत्ताधारी व विरोधक असे विभागले गेले आहेत. असे असताना शिवसेना ठाकरे गटातील विधानसभा उमेदवारीचा वाद म्हणजे करमणुकीचा खेळ म्हटला गेल्यास नवल वाटणार नाही. यापलिकडे भाजपही या वादाला फुुलविण्याचा अथवा विझवण्याचा प्रयत्न करेल असे नाही. कारण तेवढी ताकद दाखविण्याची इच्छाशक्तीच पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडे दिसत नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In sangli uddhav thackeray shivsena preparing to give candidate against guardian minister suresh khade print politics news css

First published on: 06-12-2023 at 13:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×