वाई: काहीही झाले तरी उदयनराजे निवडून आले पाहिजेत, आपण तसा शब्द दिला आहे. “उदयनराजे निवडून आले की, मी राज्यसभेच्या निवडणुकीत जून महिन्यात नितीन पाटील यांना खासदार करणारच, नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही” असे ठणकावून वाईच्या सभेत सांगणारे अजित पवार यांनी राज्यसभेसाठी पत्नी सूनेत्रा यांना संधी देऊन साताऱ्याला डावलल्याची भावना जिल्ह्यात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठा विरोध होता. कारण त्यांचे राजकारण अडचणीत येणार होते. येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची मागणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी अजित पवारांकडे केली होती. यासाठी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या उमेदवारीची शिफारस करण्यात आली होती. मात्र अजित पवारांनी कार्यकर्त्यांना समजावले, उदयनराजेंनाच उमेदवारी देण्यात येणार आहे, सर्वांनी त्यांचेच काम करायचे आहे. काही झाले तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होता कामा नये असा दम सर्वांना दिला होता.

हेही वाचा : भाजपाला पसमांदा मुस्लिमांची मतं का मिळाली नाहीत?

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचा कार्यकर्त्यांचा आजही समज आहे. सातारा जिल्हा बँकेसह,जिल्हा परिषद, जिल्हा खरेदी विक्री संघ, अनेक स्थानिक स्वराज्य व छोट्या-मोठ्या सहकारी संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. साताऱ्याचे राजकारण गटा-तटावर चालते. त्याप्रमाणे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे अशा अनेक दिग्गजांना बरोबर घेऊन सर्व संस्थांवर आपला वर्चस्व राहील असे प्रयत्न केले आहेत. मागील पंचवीस वर्षात अनेक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम शरद पवार आणि अजित पवार यांनी केले.

पक्षात झालेल्या फुटी मुळे कार्यकर्ते ही विभागले गेले आहेत. याचा बरोब्बर फायदा भाजपाने उचलला. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपयोग करून घेतला. वाई विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मकरंद पाटील व नितीन पाटील यांना कामाला लावले, आणि काही झाले तरी या मतदारसंघातून शशिकांत शिंदेंना मोठे मताधिक्य मिळणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे फक्त साडेसहा हजाराचे मताधिक्य शशिकांत शिंदेंना मिळू शकले. ते उदयनराजे सहज तोडू शकले त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.

हेही वाचा : भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नेमकी खदखद कसली?

सातारा जिल्ह्यात माजी खासदार लक्ष्मणराव पाटील म्हणजेच आमदार मकरंद व नितीन पाटील यांचा मोठा प्रभावी गट आहे. दररोज सकाळी जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते पाटील बंधूंच्या घरी भेटीसाठी येतात. उदयनराजेंना मतदान करण्यासाठी मतदारसंघातील व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची, मतदारांची समजूत घालता घालता आमदार मकरंद व नितीन पाटील घाम फुटला. किसन वीर कारखान्याला राज्य सरकारच्या थकहमीतून मिळणारी मदत आणि नितीन पाटील यांना मिळणारी खासदारकी यामुळे पाटील बंधूंच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांचे काम केले. उमेदवारीसाठी बोलावणे येईल या आशेवर नितीन पाटील होते तर आमदार मकरंद पाटील मुंबई ठाण मांडून बसले होते.

हेही वाचा : सर्वच पक्षांना मतांच्या फाटाफुटीचा धोका, विधान परिषदेच्या ११ जागांसाठी चुरस

या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बांधण्याचे काम या दोन बंधूंनी केले आहे. मात्र पक्ष फुटी पासून कार्यकर्त्यांना ताकद देण्याची कोणतीच भूमिका अजित पवार यांनी घेतल्याचे दिसले नाही. त्यांनी पक्ष संघटनेकडे विशेष असे लक्षही दिलेले नाही. त्याचा तोटा कार्यकर्त्यांना होतो आहे. समोर भाजपाचे पक्ष वाढीचे आव्हान, शरद पवारही गट वाढवण्याच्या आक्रमक भूमिकेत असताना कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. नियमितपणे अजित पवार पक्ष संघटने बाबत भाजपा पुढे बोटचेपी घेत असल्याने आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यात त्यांनी राज्यसभेचा दिलेला शब्दही फिरवल्याने त्यांच्याविषयीच्या नाराजीसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता मात्र आहे.

पुढे संधी

साताऱ्याला आता संधी देण्यात आलेली नसली तरी पियूष गोयल यांच्या लोकसभेवरील निवडीमुळे रिक्त असलेल्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा आहे. या जागेच्या पोटनिवडणुकीत साताऱ्याला संधी दिलीजाईल, असे सांगण्यात येते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In satara during lok sabha campaign ajit pawar nitin patil on rajya sabha print politics news css
First published on: 17-06-2024 at 13:39 IST