सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहाडिया हे सोलापुरात गणेशोत्सवाच्या पाठोपाठ आता नवरात्रौत्सवातही विविध मंडळाच्या भेटीतून जागर चालविला आहे. मंदिरांबरोबर दर्गाहमध्येही दर्शन घेण्याचे सत्र त्यांनी सुरू केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिखर पहाडिया यांच्या सोलापुरातील वाढत्या जनसंपर्काची रंगतदार चर्चा होत आहे.
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी सलग तीनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी त्यांचा वारसदार कोण, याची सार्वत्रिक उत्सुकता कायम असताना त्यांचे भाचे शिखर पहाडिया हे गणेशोत्सवानंतर पुन्हा नवरात्रोत्सवातही सक्रिय होत जनसंपर्क वाढविल्यामुळे तेच सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे यांचे वारस म्हणून उमेदवार राहणार काय, याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा वाढली आहे.
हेही वाचा >>>अभिजात दर्जा हा मराठीसाठी सुवर्णक्षण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार
सुशीलकुमार शिंदे यांच्या ज्येष्ठ कन्या स्मृती पहाडिया यांचे शिखर पहाडिया हे चिरंजीव आहेत. शिंदे यांना तीन कन्या असून खासदार प्रणिती शिंदे यांचा अपवाद वगळता अन्य दोघी कन्या राजकारणापासून अलिप्त आहेत. इकडे सोलापूर शहर मध्य विधानसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार दावेदारी सुरू असतानाच शिखर पहाडिया हे सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवत असल्यामुळे काँग्रेसकडून सोलापूर शहर मध्ये विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी पुढे येणार काय, याची उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा >>>पंतप्रधानांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची छाप
या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी आपला भाचा शिखर पहाडिया यांच्या सोलापुरातील वाढत्या जनसंपर्काचा आणि आगामी विधानसभा निवडणुकीचा कोणताही संबंध नसल्याचा निर्वाळा दिला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभेसाठी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यालाच संधी दिली जाईल, याचे स्पष्ट सुतोवाचही त्यांनी केले आहे. याउपरही शिखर पहाडिया यांचे विविध उत्सव मंडळांच्या भेटीत स्वागत-सत्कार केले जात आहे. मंदिरे आणि दर्गाहमध्येही भेटी देण्याचे सत्र शिखर पहाडिया यांनी सुरू केल्यामुळे तसेच काही प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांनी पहाडिया यांना आमदारकीची संधी मिळण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय नजरेतून त्याची रंगतदार चर्चा होत आहे.