एजाजहुसेन मुजावर

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीने सत्तेचा लाभ उठवत स्वतःची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला. सोलापूर महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कॉंग्रेस, शिवसेनेसह विविध छोट्या पक्षांतून अनेक स्थानिक राष्ट्रवादीच्या वाटेवर असताना राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्याचा मोठा अडथळा राष्ट्रवादीच्या विस्तारावर झाला असून स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाकडे मोर्चा वळवल्याने सोलापूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा- रत्नागिरीत आमदार सामंत यांच्या समर्थकांना शिवसेनेच्या पदांवरून हटवले

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर गेल्या पाच वर्षांत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद घटली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आक्रमक राजकारणामुळे सोलापूर शहरात अनेक माजी नगरसेवक, स्थानिक नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे अनेक वर्षे विश्वासू राहून सत्तासुख भोगलेले दिवंगत विष्णुपंत कोठे यांचे पुत्र, माजी महापौर महेश कोठे यांनी दहा वर्षांपूर्वी सुशीलकुमारांवरील निष्ठा वाऱ्यावर सोडून आमदार होण्यासाठी काँग्रेसमधून शिवसेनेत उडी मारली होती. त्याच सुमारास कोठे यांच्याच तालमीत तयार झालेले पूर्वाश्रमीचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तौफीक शेख यांनीही २०१४ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून सोयीनुसार एमआयएममध्ये जाऊन सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी दुसरीकडे महेश कोठे हे शिवसेनेकडून प्रणिती शिंदे यांना आव्हान देत होते. धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयोगातून कोठे आणि शेख यांनी बघितलेले आमदारकी स्वप्न झटक्यात भंग पावले. नंतरच्या पाच वर्षांत स्थानिक राजकीय समीकरण बदलले. पुढील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली. तर तिकडे पलिकडे एमआयएमचे तौफिक शेख हे कर्नाटकातील एका महिलेच्या प्रेमाच्या प्रकरणात सापडले. त्यातूनच रेश्मा कडेकनूर नावाच्या त्या महिलेचा खून झाला. त्यात तौफिक शेख हे तुरुंगात गेले. परिणामी इकडे एमआयएममध्ये त्यांचे भवितव्य धोक्यात आले. तत्पूर्वी, स्वतः ची ताकद वाढविण्यासाठी कोठे व शेख यांनी २०१७ सालच्या सोलापूर महापालिका निवडणुकीत राजकीय संगनमत केले. 

हेही वाचा- ‘एका’चतुर्वेदींनी काँग्रेस बुडवली, ‘दुसरा’सेना संपवणार?

एव्हाना, महेश कोठे यांनी सोलापूर महापालिकेतील प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर शिवसेना खिशातच घातली होती. परंतु मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद वाढविण्यावर भर दिला.  त्यानंतर महेश कोठे यांनी विचारपूर्वक शरद पवार यांच्या संपर्कात येऊन आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित करून दाखविण्याचा विश्वास दिला. शरद पवार आणि अजित पवार यांनीही कोठे यांच्यावर विश्वास ठेवून सोलापुरात राष्ट्रवादीची संपूर्ण सूत्रे कोठे यांच्याकडे दिली. त्यामुळे पक्षातील काही जुनी प्रस्थापित मंडळी आतून दुखावली. परंतु ‘ सहन होईना अन् सांगता येईना ‘ अशी त्यांची केविलवाणी अवस्था झाली. त्यातच कोठे यांनी काँग्रेसमधील आपले जुने मित्र माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया, नलिनी चंदेले, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यासारख्या काँग्रेसमध्ये दुखावलेल्या मंडळींना राष्ट्रवादीत आणून संतुष्ट केले. एवढेच नव्हे तर एमआयएमपासून दुरावलेले तौफीक शेख यांनाही राष्ट्रवादीच्या दारावर आणून उभे केले. त्यामुळे पवार काका-पुतणे कोठे यांच्यावर जाम खूश झाले. या साऱ्या घडामोडीत कोठे यांनी स्वतः मात्र अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला नव्हता. दुसरीकडे सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या कच्छपि लागलेले पूर्वाश्रमीचे बसपाचे व नंतर वंचित बहुजन आघाडीत गेलेले ज्येष्ठ नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनाही राष्ट्रवादीत प्रवेश करावासा वाटू लागला. यासह इतर अनेकजण राष्ट्रवादीच्या मंडपात येण्यासाठी आतूर झाले असताना राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊन ठाकरे सरकार कोसळले आणि राष्ट्रवादी सत्तेबाहेर गेली. त्यामुळे कालपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेली मंडळी आता या पक्षात जाण्यात काय हशील, असा विचार करू लागली आहेत.

याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पंढरपूरच्या आषाढी वारीत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महेश कोठे यांनी भेट घेतली. एवढेच नव्हे तर त्यांच्या साक्षीने त्यांचे विश्वासू सहकारी तथा महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, मनोज शेजवाल आदी मंडळींनी एकनाथ शिंदे यांच्यावर निष्ठा वाहत त्यांच्या गटात प्रवेश केला. कोठे यांच्या डोळ्यांदेखत त्यांचेच जीवाभावाचे सहकारी राष्ट्रवादीचा विचार सोडून झटक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यामुळे कोठे यांची एकूणच राजकीय विश्वासार्हता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. शरद पवार यांनी कोठे यांना तात्काळ मुंबईत बोलावून घेऊन खुलासा मागितला. तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीत सोडणार नाही, असे वचन कोठे यांनी दिले खरे; परंतु त्यांची सुशीलकुमार शिंदे यांच्यापासूनची राजकीय वाटचाल लक्षात घेता कोठे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे. 

या स्थितीत राष्ट्रवादीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीची संपूर्ण सूत्रे महेश कोठे यांच्याकडे सोपविली जातील किंवा कसे, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे एमआयएमचे तौफीक शेख यांची अडचण  पाहता त्यांना राष्ट्रवादीतच राहण्याशिवाय तरणोपाय नाही, असे सांगितले जाते. तर वंचित बहुजन आघाडीपासून दूर झालेले आनंद चंदनशिवे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. राष्ट्रवादी प्रवेशासाठी त्यांनी महेश कोठे यांच्यापासून अंतर ठेवून तत्कालीन पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या सोबत राहण्याचा मार्ग पत्करला होता. परंतु ते आता राष्ट्रवादी प्रवेशाबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून येते.