कसब्यात उमेदवारीवरून भाजपमध्येच चुरस | In the BJP over the candidature in Kasba For by elections print politics news ysh 95 | Loksatta

कसब्यात उमेदवारीवरून भाजपमध्येच चुरस

कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणे, हे भाजपच्या दृष्टीने जिकिरीचे झाले आहे.

bjp kasba election
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सुजित तांबडे

पुणे : कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणे, हे भाजपच्या दृष्टीने जिकिरीचे झाले आहे. त्यामुळेच पाच नावांची शिफारस करण्यात आली आहे. पाचही उमेदवार तिकिटासाठी दावेदार असून, प्रत्येकाची जमेची तशीच उणी बाजूही आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची, असे कोडे पक्षाला पडले आहे. आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतर्गत मतभेद उफाळून येऊ नयेत, याची पुरेपूर खबरदारी भाजपकडून घेण्यात आली असून त्यासाठीच राजकीय समिती, संघटनात्मक समिती आणि व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे या मतदार संघात २६ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची महाबैठक घेण्यात आली. त्यामध्ये पाच नावांची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि चिरंजीव कुणाल यांचा नावाचा समावेश आहे. पुणे महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर आणि धीरज घाटे; तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांचीही नावे त्या यादीत आहेत. या नावांची शिफारस करण्यात आली असली, या नावांवर राज्य पातळीवर चर्चा करण्यात आल्यावर तीन नावे केंद्रीय स्तरावर पाठवून त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

हेही वाचा >>> ‘शिक्षक’च्या निवडणुकीत संस्थाचालकांची चांदी

टिळक कुटुंबियांपैकी एकाला उमेदवारी देण्याची मागणी आहे. त्यामुळे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि मुलगा कुणाल या दोघांच्याही नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी कुणाल टिळक यांचा प्रत्यक्ष राजकारणातील अनुभव कमी आहे. त्यामुळे शैलेश टिळक हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जातात. अन्य तिन्ही उमेदवार हे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक होते. त्यावेळी मुक्ता टिळक यांना पक्षाने संधी दिली होती. त्यामुळे आता टिळक कुटुंबियांऐवजी अन्य इच्छुकाला उमेदवारी देण्याचाही पक्षातील काहीजणांचा आग्रह आहे.

इच्छुकांपैकी गणेश बिडकर हे मागील दोन निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्याची मागणी करत आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लावून पुन्हा महापालिकेत प्रवेश दिला. त्यानंतर सभागृह नेते पदाचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. नुकतीच त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत त्यांना भरपूर संधी दिली मिळाली असल्याचे प्रतिस्पर्धी उमेदवारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> पदवीधर आणि शिक्षकमध्ये कोण बाजी मारणार?

हेमंत रासने यांनाही पक्षाकडून अनेकदा संधी मिळाली आहे. त्यांनी सलग चारवेळा स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. कसबा मतदार संघात त्यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. माजी सभागृह नेते धीरज घाटे हेदेखील प्रबळ उमेदवार आहेत. आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. आक्रमकता ही त्यांची जमेची बाजू असली, तरी उमेदवारी देताना तोच अडथळा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राजकीय समितीची जबाबदारी आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे देण्यात आली असून, माजी खासदार संजय काकडे यांच्याकडे  सहायक म्हणून काम सोपविण्यात आले आहे. राजेश पांडे आणि राजेश येनपुरे यांच्याकडे संघटनात्मक समिती, तर प्रमोद कोंढरे हे व्यवस्थापन समितीचे काम पाहणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 09:52 IST
Next Story
‘शिक्षक’च्या निवडणुकीत संस्थाचालकांची चांदी