पंढरपूर : माढा लोकसभा मतदार संघात जवळपास पाच लाख धनगर मतदार आहेत. या जागेसाठी धनगर समजाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महादेव जानकर, डॉ अनिकेत देशमुख , उत्तम जानकर, प्रा.लक्ष्मण हाके या नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र यातील काही नेत्यांची समजूत काढण्यात आली. तर दुसरीकडे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सांगोल्यातील भाई गणपतराव देशमुख यांचे पुतणे ॲड.. सचिन देशमुख, महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर आणि मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदार संघातील सुप्त असलेला धनगर समाज या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहे.

माढा लोकसभा मतदार संघ हा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिला आहे. सुरुवातील भाजपाच्या उमेदवारी वरून नाराजी झाली. त्या नंतर मोहिते पाटील यांचे भाजपा बंड करून शरद पवार गटात सामील झाले. त्या आधी या जागेसाठी रासपचे महादेव जानकर इच्छुक होते. भाजपा दखल घेत नाही असे लक्षात आल्यावर महादेव जानकर यांनी शरद पवारांची थेट भेट घेतली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकारांची समजूत काढून त्यांना परभणी मधून उमेदवारी दिली. यामध्ये भाजपा यशस्वी झाली. मात्र त्याच वेळी महाविकास आघाडी मध्ये सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख इच्छुक होते. शेकापचे जयंत पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र त्या नंतर देशमुख यांचे नाव मागे पडले. बुधवारी डॉ अनिकेत देशमुख यांनी अपक्ष अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले. त्याच वेळी त्यांना बारामती येथे शरद पवारांनी भेटण्यास बोलवल्याचा निरोप आला आणि डॉ अनिकेत देशमुख यांचे बंड हे थंड करण्यात पवार यशस्वी झाले.

या मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी धनगर समजाचे तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केला. या मध्ये भाई गणपतराव देशमुख यांचे पुतणे अॅड. सचिन देशमुख यांनी अर्ज दाखल केला. अॅड. सचिन देशमुख यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्या सोबत गेली अनेक वर्ष राजकारण, समजाकारण मध्ये बरोबरीने काम केले. ते जिल्हा परिषद सदस्य होते. तर महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांनी अर्ज दाखल केला. तसेच मागास वर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी महात्मा फुले यांचा वेश परिधान करून अर्ज दाखल केला. याच बरोबरीने माळशिरस येथे नेते उत्तम जानकर हे देखील नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खास विमानाने नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली. आमची भेट सकारात्मक झाली. माझी पुढील भूमिका कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवणार असे भेट झाल्यावर उत्तम जानकर यांनी जाहीर केले. उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांचा राजकीय संघर्ष होता. त्यामुळे जानकर कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. मात्र मोहिते पाटील यांनी जानकर यांची मतभेद दूर करण्याची भूमिका घेतली. आणि ठरल्या प्रमाणे शुक्रवारी उत्तम जानकर यांनी कार्यकर्त्याची बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,जयसिंह मोहिते पाटील, माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांचा संघर्ष संपवून त्यांचा प्रचार करण्याचे जाहीर केले. मी जरी राष्ट्रवादी कॉंग्रस ( अजित पवार ) पक्षात असलो तरी मी मोहिते पाटलांचा प्रचार करणार असे जाहीर केले.

हेही वाचा… चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार? आसामात काय आहेत राजकीय समीकरणं?

धनगर समाजाची आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्याचा कोणता परिणाम या मतदारसंघात होतो याचीही उत्सुकता असेल.