-सुहास सरदेशमुख

बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी फुटू नये आणि पडझड थांबावी म्हणून आयोजित आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद मेळाव्यातील गर्दीचा रंग भगवा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या सभेतील गर्दीत रंग पांढरा नजरेत भरणारा… मुख्यमंत्र्यांच्या सभेत भगव्या रंगाचे तसे काही मोजकेच गमछे. साखर कारखान्याच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमातील गर्दी तशी पांढऱ्या रंगातील कपड्यांची. काही कपडे शुभ्र, काही फिकट पांढरे, बहुतांश मळलेले पांढरे सदरे. साखर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभेला असते तशी गर्दी. दुसरीकडे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद मेळाव्यात ‘गद्दार’ असा शब्दप्रयोग करत नेत्यांचे भाषण रोखून बंडखोरीची यथेच्छ पोलखोल करणारे कार्यकर्ते,प्रतिक्रियाही उस्फूर्त ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भाषणात योजनांना निधी मिळतोय म्हणून अधून- मधून टाळ्या, असे दोन्ही बाजूच्या गर्दीचे चित्र होतेे.

शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये बंडखोर आमदारांविरोधात कमालीचा रोष –

पडझड रोखताना शिवसैनिकांच्या मनात नक्की काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केला. औरंगाबाद शहरातील संजय शिरसाट व प्रदीप जैस्वाल हे दोन आमदार शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये बंडखोर आमदारांविरोधात कमालीचा रोष होता. आदित्य ठाकरे भाषणात म्हणाले, ‘काय कमी केले शिवसेनेने देताना?’, तेव्हा आदित्य ठाकरेंचे भाषण चालू असताना शिवसैनिक ओरडत होते – ‘५० कोटी, पन्नास कोटी’. आमदाराचे नाव घ्यावे आणि शिवसैनिकांनी टाेमणे मारावे, असे प्रकार आदित्य ठाकरे यांचे भाषण थांबवूनही सुरू होते. शहरी भागातील मेळाव्यात गळ्यात शिवसेनेचा भगवा गमछा घालणारे अधिक होते. सहानुभूती मिळविणारे आदित्य ठाकरे यांचे भाषण आणि त्यात फुटून गेलेल्या आमदारांवरील राग़ तर पलीकडे तरुण आणि जुन्या शिवसैनिकांमध्येही हाच राग ठासून भरलेला.

आक्रमक घोषणापेक्षाही निधीचा जोर असेल तिथेच टाळी –

एका बाजूला भगव्या गर्दीतील आक्रमकपणा तर दुसरीकडे पांढऱ्या रंगांतील सदऱ्याची गर्दी. बियाणे उत्पादक कंपनीच्या प्रभाकर शिंदे या उद्योजकाने आयोजित केलेल्या वैजापूर येथील साखर कारखान्याच्या भूमीपूजनास शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असणाऱ्या या कार्यक्रमावर तशी ग्रामीण छाप. पांढऱ्या रंगात उठून दिसणारी. येथे फक्त योजनांच्या निधीला टाळी. पण आक्रमक घोषणापेक्षाही निधीचा जोर असेल तिथेच टाळी असा गर्दीचा मानस.

अंगावरचे पांढरे सदरे आणि पायजमे हे सत्तेच्या बाजूने असतातच. मंचावरील पांढरे कपडे कडक इस्त्रीचे आणि खाली मळका पांढरा रंग असतो. राष्ट्रवादी सत्तेत अग्रेसर असताना दिसणारे नेहमीचे चित्र वैजापूर येथील मुख्यमंत्र्याच्या सभेतही दिसून आले.