प्रबोध देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते कामात कथित अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केल्यानंतर या प्रकरणात अकोल्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री बच्चू कडूंना साथ दिली. विशेष म्हणजे राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी विरोधात रान उठवणारे भाजपचे लोकप्रतिनिधीदेखील बच्चू कडूंच्या बाजूने उभे राहत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.  वंचितने आरोपरुपी केलेला ‘प्रहार’ पाहून बच्चू कडूंच्या बचावासाठी भाजप ‘ढाल’ घेऊन पुढे आली. या घडामोडींची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

अकोला जिल्हा राजकीयदृष्ट्या भाजपचा गड. जिल्ह्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. अकोला जिल्हा परिषदेवर गत दोन दशकांहून अधिक कालावधीपासून अ‍ॅड. आंबेडकर यांच्या पक्षाची सत्ता कायम आहे. राज्यात बदलेल्या राजकीय समीकरणानंतर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात अकोल्याला प्रतिनिधित्व मिळाले नाही. जिल्ह्यात १८ वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादीची पाटी कोरीच असून शिवसेनेचा एकच नवखा आमदार आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर कोण, हा प्रश्न असतांनाच शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंंत्री झालेले बच्चू कडू यांच्या गळ्यात अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची माळ पडली. अमरावती जिल्ह्यातील बच्चू कडूंनी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री होणे अनेक लोकप्रतिनिधी व स्थानिक मोठ्या नेत्यांना अद्यापही रुचलेले नाही. पालकमंत्री बच्चू कडूंनी मात्र सगळ्यांशी जुळवून घेत विकास कामे करण्यावर भर दिला.    

वंचितची सत्ता असलेल्या अकोला जिल्हा परिषदेच्या काही प्रकरणांमध्ये बच्चू कडूंनी घातलेले लक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना आवडले नाही. त्यामुळे वंचित आघाडी व बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दोन्ही बाजूने उणीधुणी काढून एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. जिल्हा परिषद राजकारणाची आवड असणारे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची देखील त्यात भूमिका असून बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाची सुद्धा त्यामागे पार्श्वभूमी आहे. वंचित विरूद्ध प्रहार अशी राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली. रस्ते कामात पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीचा कथित अपहार केल्याची तक्रार वंचितच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने बच्चू कडूंवर गुन्हे दाखल झाले व नियमित जामीनदेखील मिळाला. बच्चू कडूंनी आक्रमक पवित्रा घेत, सर्व आरोप फेटाळून लावत ती कामे लोकप्रतिनिधींच्या शिफारशीने व सुर्वानुमते करण्यात आल्याची बाजू मांडली. ज्या कामांत कथित अपहार झाल्याचा आरोप वंचितने केला, ती कामे भाजपचे खासदार संजय धोत्रे, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, शिवसेनेचे आ. नितीन देशमुख यांनी सुचवलेली आहेत.

कथित अपहार प्रकरणांत बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर हे समोर आले आहेत. राज्यात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. अकोल्यात मात्र चित्र वेगळेच दिसून येते. कथित अपहार प्रकरणी पालकमंत्री बच्चू कडूंना भाजपची साथ मिळाली. भाजपचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री बच्चू कडूंच्या पाठीशी आहेत. आ. सावरकरांनी जाहीरपणे बच्चू कडूंची बाजू घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या आधीदेखील जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपने आपले वजन प्रहारच्या पारड्यात टाकले. त्यामुळे प्रहारला सभापतीपद मिळाले. कथित अपहार प्रकरणात वंचित विरूद्ध सर्व असा सामना होत आहे. बच्चू कडूंची बाजू घेणाऱ्या आमदारांवर देखील वंचितने आरोपाचे सत्र सुरू केले. अकोला जिल्हा परिषद वंचितचे एकमेव सत्ताकेंद्र. इतर सर्व पक्ष एकत्र आल्यास वंचितची सत्ता धोक्यात येऊ शकते. वंचित आघाडीला तीच भीती आहे. जिल्ह्याच्या राजकारणात वंचित सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे. आगामी काळात वंचित विरूद्ध प्रहार संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the state bjp fight with mahavikas aaghadi but on other hand bjp stand for bachchu kadu after allegation made by prakash ambedkar pkd
First published on: 19-05-2022 at 17:07 IST