उत्तर प्रदेश विधानसभेत एक वेगळंच नाट्य घडले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांच्यामध्ये शाब्दिक टोलेबाजी रंगली. योगी आदित्यनाथ यांनी सभागृहात भाषण करताना अखिलेश यादव यांचे काका आणि आमदार शिवपाल यादव यांचे भरभरून कौतुक केले. यानंतर अखिलेश यादव यांनी या मुद्यावरून मुख्यमंत्री योगी आदीयनाथ यांना कोपरखळ्या मारल्या. अखिलेश म्हणाले” मा. मुख्यमंत्र्यांना आमच्या काकांची खूप जास्त चिंता आहे”. अखिलेश यांच्या या वाक्यानंतर सभागृहात एकाच हशा पिकला. या घटनेच्या एक दिवस आधी शिवपाल यादव यांनी सभागृहात योगी आदित्यनाथ हे इमानदार आणि प्रगतिशील मुख्यमंत्री आहेत असा उल्लेख करत योगींवर स्तुतीसुमने उधळली होती. सुरवातीला शिवपाल यांनी योगी आदित्यनाथ यांची स्तुती करणे आणि नंतर आदित्यनाथ यांनी शिवपाल यांचे केलेले कौतुक यातून शिवपाल आणि अखिलेश यांच्यातील दरी वाढत असल्याचे स्पष्ट होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेत योगी विरूद्ध अखिलेश

याची सुरवात योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना केलेल्या भाषणापासून झाली. योगी आदित्यनाथ यांचे अभिभाषणावरील उत्तर संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अखिलेश म्हणाले की योगी आदित्यनाथ यांनी खूप मोठे आणि लांबलेले भाषण केले. पण त्यांनी उपस्थित केललेल्या मुद्यांना स्पर्शसुद्धा केला नाही.पण हे मात्र खरे आहे की मुख्यमंत्र्यांना माझ्या काकांची भरपूर चिंता आहे. हा आधी ते फक्त माझे काका होते, मात्र आता ते विरोधी पक्षनेत्याचे काका आहेत. शिवपाल यादव हे नुकतेच आमदार झाले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर अखिलेश आणि शिवपाल यांच्यातील दुरावा वाढत असल्याच्या बातम्या येत होत्या आणि आता शिवापाल यांनी योगी आदित्यनाथ यांची स्तुती केली आहे.

योगींनी त्यांच्या भाषणात अखिलेश यांच्या टीकेचा समाचार घेताना म्हटले होते की ” तुम्ही समाजवाद-समाजवाद म्हणून कितीही ओरडा, तुम्ही समाजवादाला मृगजळ करून टाकले आहे. समाजवादाची चर्चा करायची तर राम मनोहर लोहिया यांची करा, जयप्रकाश नारायण यांची करा”. अखिलेश यांना उद्देशून योगी म्हणाले पुढे की “हल्ली शिवपालजी डॉ. लोहिया यांच्याबाबत खुप लिखाण करत आहेत. त्यांच्याकडून तुम्ही डॉ. लोहीया यांच्याबाबत माहिती घेऊ शकता”. 

वाढता दरी

अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी त्यांना पक्षात डावलले जात असल्याचा आरोप करत उघडपणे नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये शिवपाल यादव यांनी समाजवादी पक्षाचा राजीनामा दिला आणि ते पक्षातून बाहेर पडले. या राजीनाम्यमुळे यादव कुटुंबात मोठी दरी निर्माण झाली. त्यानंतर शिवपाल यांनी समाजवादी पक्ष ( लोहिया गट) हा स्वतःचा पक्ष स्थापन केला.२०२२ ची विधानसभा निवडणूक अखिलेश यांच्या समाजवादी पक्षासोबतच लढली होती. मात्र नंतर त्यांच्यातील अंतर वाढतच गेले. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In utter pradesh assembly cm yogi counter lop akhilesh yadav through shivpal yadav
First published on: 28-05-2022 at 11:06 IST