scorecardresearch

पश्चिम विदर्भातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नेतृत्वाची कुंठितावस्था

चांगली कामगिरी करूनही पश्चिम विदर्भातील‍ अनेक शिवसेना खासदार-आमदारांना प्रथम पंक्तीत स्थान का मिळू शकले नाही, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

पश्चिम विदर्भातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नेतृत्वाची कुंठितावस्था

मोहन अटाळकर

शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम विदर्भातील सेनेच्या दोन खासदारांची अस्वस्थता, तीन आमदारांचे बंड यामुळे शिवसैनिक संभ्रमित असून सत्ताप्राप्तीमुळे फायदा पण, पक्षविस्तार, स्थानिक नेतृत्व या बाबींमध्ये कुंठितावस्था असे गेल्या दोन दशकांतील चित्र आहे. 

१९९० च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भात शिवसेनेला उल्लेखनीय यश मिळाले. त्यावेळी या विभागातून सात आमदार निवडून आले. २००४ च्या निवडणुकीत ही संख्या आठवर पोहचली. १९९६ पासून शिवसेनेच्या दोन ते तीन खासदारांनी कायम या विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी चार वेळा तर बुलढाण्याचे प्रताप जाधव हे सलग तीन वेळा निवडून आलेले. चांगली कामगिरी करूनही पश्चिम विदर्भातील‍ अनेक शिवसेना खासदार-आमदारांना प्रथम पंक्तीत स्थान का मिळू शकले नाही, याची चर्चा आता सुरू झाली आहे. शिवसेनेतील नेते, उपनेते, सचिव या फळीत पश्चिम विदर्भातील एकही नेता नाही. बुलढाणा-अमरावतीचे खासदार राहिलेले आनंदराव अडसूळ यांचा एक अपवाद. पण, अडसुळांचे राजकारणही मुंबईतच स्थिरावलेले. निवडणुकीतील मतांचे गणित जुळवण्यात सेनेच्या नेत्यांना यश आले असले, तरी पक्षसंघटनेवर पकड मजबूत करण्यात कौशल्याचा अभाव जाणवल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

१९९१ पासून चार वेळा शिवसेनेला मोठे खिंडार पाडणाऱ्या घटना घडल्या. पहिल्या फुटीच्या वेळी पश्चिम विदर्भातील सातपैकी पाच आमदार बाहेर पडले. कालांतराने ते सर्व नंतरच्या काळात राजकारणाबाहेर फेकले गेले. त्यावेळी सेनेसोबत राहिलेले गुलाबराव गावंडे सध्या राष्ट्रवादीत आहेत. नारायण राणेंसोबत बंड पुकारणारे दर्यापूरचे प्रकाश भारसाकळे काँग्रेसमार्गे भाजपवासी झाले. अनेक आमदारांना विजयातील सातत्य टिकवून ठेवता आले नाही. त्यामुळे या विभागातील सेना आमदारांची संख्या कमी होत गेली.

पूर्व विदर्भात नेते-आमदार टिकवण्यात शिवसेनेला कायमच अपयश

निवडणुकीत चांगली कामगिरी करूनही नेतृत्वगुणाअभावी शिवसेनेच्या पश्चिम विदर्भातील एकाही नेत्याला राज्याच्या राजकारणात पुढारपण घेता आलेले नाही, हे शल्य शिवसैनिकांना आहे. अंतर्गत गटबाजीचा फटका देखील शिवसेनेला सातत्याने बसत आला. काही ठिकाणी तर दोन-दोन जिल्हाप्रमुख नेमण्याची वेळ आली. शिवसेना पक्षसंघटनेत संपर्कप्रमुखांचे वेगळे महत्व आहे. हे संपर्कप्रमुख कायम विदर्भाबाहेरचे राहिलेले आहेत. या संपर्कप्रमुखांनी देखील गटबाजीला खतपाणी घालण्याचे प्रकार घडल्याने शिवसैनिक सैरभैर झाल्याचे पहायला मिळाले. दिवाकर रावते, आनंदराव अडसूळ, रवींद्र मिर्लेकर, अरविंद सावंत यासारख्या नेत्यांनी संपर्कप्रमुख म्हणून या विभागाची जबाबदारी सांभाळली, पण त्यांनाही गटबाजी रोखण्यात यश मिळू शकले नाही. यवतमाळ जिल्ह्यात भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातील विसंवाद, अमरावतीत दिवाकर रावते आणि आनंदराव अडसूळ यांच्या गटातील संघर्ष,‍ अकोल्यातील जिल्हा प्रमुखपदाचा वाद, अशी अनेक उदाहरणे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे परतवाडा हे आजोळ. त्याचा उल्लेख ते भाषणातून नेहमी करतात.‍ पश्चिम विदर्भाने सेनेला गतकाळात भरभरून दान देऊनही स्थानिक कणखर  नेतृत्वाअभावी आपले प्रभावक्षेत्र टिकवता आले नाही, हे दिसून आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या