पुणे : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील या एकेकाळच्या पारंपरिक राजकीय विरोधकांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ इंदापूरमध्ये एकत्र आल्या. त्यामुळे इंदापूरच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले. आता या कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्यातील मैत्री कायम राहणार की, दोन्ही ‘राष्ट्रवादी’ स्वबळावर निवडणूक लढणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
या कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. या कारखान्याची मागील निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र, इंदापूर तालुक्यातल राजकीय समीकरणे बदलली असल्याने यंदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येते.
मित्र झाले शत्रू आणि शत्रू झाले मित्र!
या कारखान्याची मागील निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, मधल्या काळात या तालुक्यातील राजकीय गणिते बदलली. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकेकाळचे कट्टर राजकीय शत्रू होते. ते आता मित्र झाले असल्याने इंदापूरचे राजकारण बदलले आहे. भरणे आणि पाटील हे एकत्र आल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने सर्व जागांवर विजय मिळवित भाजपचा पराभव केला.
भरणे-पाटील यांच्या मैत्रीमुळे इंदापूरमधील राजकीय नातेसंबंधही बदलले. पाटील यांच्याबरोबर असलेले भाजपचे नेते प्रवीण माने यांच्याशी पाटील यांचे वैर झाले. माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर हे नगरपालिकेच्या निवडणुकीत पाटील यांच्याबरोबर होते. त्यांनी नगराध्यक्ष पदाची पुन्हा निवडणूकही लढवली. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. चार नगरसेवक निवडून आणण्यात ते यशस्वी ठरले. पाटील यांनी भरणे यांच्याशी हातमिळवणी केल्याने गारटकर हे भाजपमध्ये गेले. त्यामुळे माने आणि गारटकर हे एकेकाळचे वैरी आता मित्र झाले आहेत. या बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे.
निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे
या कारखान्याची आर्थिक घडी विस्कटल्याने हर्षवर्धन पाटील यांनी पुढाकार घेत ओंकार शुगरबरोबर दोन वर्षांपूर्वी सहयोगी पद्धतीने कारखाना चालविण्याचा करार केला. या निर्णयावरून संभ्रमावस्था निर्माण झाली. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, कारखान्यावरील कर्ज हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे असणार आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम
– उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : १६ ऑक्टोबर
– उमेदवारी अर्जांची छाननी : १९ ऑक्टोबर
– उमेदवारी अर्ज मागे घेणे : ४ नोव्हेंबर
– मतदान : १३ नोव्हेंबर
– मतमोजणी : १५ नोव्हेंबर
