पुणे : इंदापूर नगरपरिषदेमध्ये ‘शत्रुचा शत्रू तो मित्र’ या तत्त्वाचा अवलंब करत राजकीय डावपेच खेळण्यात आल्याने यंदाची ही निवडणूक रंगतदार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी नाकारून माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी दिल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
गारटकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हाडवैर विसरून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांनी ‘शत्रुचा शत्रू तो मित्र’ हे लक्षात घेत गारटकर यांना पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू सहकारी शहा यांना पक्षात घेतल्याने एकेकाळच्या कट्टर मित्रांमध्ये राजकीय वैराग्नी पेटला आहे. त्यामुळे इंदापूरमधील लढत लक्षवेधक झाली आहे.
मागील निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भरत शहा हे, तर प्रदीप गारटकर आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे एकत्र होते. या निवडणुकीमध्ये राजकीय बदल झाला असून, हे मित्र आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने कृष्णा भीमा आघाडीला पाठिंबा दिला असून, गारटकर हे आघाडीचे उमेदवार आहेत. आतापर्यंत हर्षवर्धन पाटील, गारटकर आणि प्रवीण माने हे नेते एकमेकांचे विरोधक होते. या निवडणुकीत कृष्णा भीमा विकास आघाडीमध्ये तिघेही एकत्र असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला आव्हान दिले आहे.
शहा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने नाराज झालेले गारटकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन कृष्णा भीमा विकास आघाडीकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही लढत चुरसीची झाली आहे. गारटकर यांनी राजीनामा देण्यापूर्वी ‘पक्षाने आम्हाला डावलले तर आम्हीही पक्षाला डावलू’, असा इशारा दिला होता. तसेच उमेदवारी डावलण्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे एकेकाळचे मित्र असलेले भरणे आणि गारटकर यांच्यात कटूता निर्माण झाली आहे.
गारटकर यांची कर्मभूमी इंदापूर आहे. १९९२ ते १९९७ पर्यंत ते इंदापूरचे नगराध्यक्ष होते. त्यानंतर सलग दहा वर्षे नगरपालिका त्यांच्या गटाच्या ताब्यात राहिली. त्यांनी बारा जणांना नगराध्यक्षपदाची संधी उपलब्ध करून दिली. संघर्षाच्या काळातही गारटकर यांनी हर्षवर्धन पाटील मंत्री असतानाही कोणत्याही पक्षाचा आधार न घेता स्वबळावर इंदापूर नगरपरिषद ताब्यात ठेवली होती. आता पाटील हे त्यांच्याबरोबर आहेत.
भाजपमध्ये प्रवेश केलेले सोनाई उद्योग समूहाचे प्रवीण माने यांचे वास्तव्य इंदापूर शहरात आहे. त्यांच्या समूहाचे कार्यक्षेत्र या परिसरात आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी इंदापूरमधून अपक्ष निवडणूक लढवत लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीतही माने यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. तेदेखील गारटकर यांच्या पाठिशी असल्याने गारटकर यांची ताकद वाढली आहे.
भरत शहा हे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष आहेत. शहा परिवाराचे गेल्या दोन दशकांपासून इंदापूरच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात योगदान आहे. त्यामुळे त्यांचाही प्रभाव आहे.
या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार आहेत. मात्र, प्रमुख लढत ही गारटकर आणि शहा यांच्यात होणार आहे.नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी ९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे प्रवीण माने, गारटकर आणि शहा आदी प्रमुख राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पणाला लागणार आहे.
