पुणे : राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकेकाळचे कट्टर राजकीय शत्रू हे मित्र झाल्याने इंदापूरचे राजकारण बदलले आहे. भरणे-पाटील या जोडीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सर्व जागा घेत भाजपचा दारुण पराभव केला. आता इंदापुरात कृषीमंत्री भरणे हे आणखी सक्रिय झाल्याने इंदापूरमध्ये भाजप हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

इंदापूरचे राजकारण हे मागील अनेक वर्षांपासून भरणे आणि पाटील यांच्याभोवती फिरत आले आहे. २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भरणे-पाटील हे आमने-सामने आले. २००९ मध्ये पाटील यांनी भरणे यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ पासून सलग तीनवेळा भरणे यांनी पाटील यांना पराभूत केले. त्यामुळे दोघांमध्ये राजकीय वैर हे वाढत गेले.

मात्र, यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादींनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने हे कट्टर राजकीय वैरी मित्र झाले. शिवाय हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे आणि भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे दोघांचे मनोमीलन झाले. त्यांनी इंदापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या आठ जागांसह पंचायत समितीच्या सोळा जागा जिंकून प्रतिस्पर्धी भाजपच्या सर्व उमेदवारांचा पराभव करून ‘राष्ट्रवादी’ची ताकद दाखवून दिली. भाजपचे नेते प्रवीण माने यांच्या साथीला अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असतानाही भाजपला मतदारांनी स्वीकारले नाही.

सतत बदलती राजकीय समीकरणे

गेल्या विधानसभा निवडणुकीत सुमारे चाळीस हजार मते मिळविणारे भाजपचे नेते प्रवीण माने यांच्या नेतृत्त्वाखाली इंदापूरमध्ये भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढविली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून बाहेर पडून इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर हेदेखील भाजपमध्ये गेले. तत्पूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीत गारटकर यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्यांना कमी मतांच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, चार नगरसेवक निवडून आणण्यात ते यशस्वी ठरले. त्या वेळी झालेल्या आघाडीत गारटकर यांच्याबरोबर हर्षवर्धन पाटील होते. मात्र, पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातच राहणे पसंत केले. तसेच भरणे यांच्याशी हातमिळवणी केल्याने इंदापूरमध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.

भरणे आणखी सक्रिय

इंदापूरमध्ये कायम अडथळा ठरत असलेले हर्षवर्धन पाटील हे आता मित्र झाल्याने कृषी मंत्री भरणे हे आणखी सक्रिय झाले आहेत. भरणे-पाटील या जोडीपुढे इंदापुरात भाजप आता हतबल झाल्याचे दिसून येत आहे.