पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभेची निवडणूक जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपले लक्ष्य आगामी निवडणुकांकडे वळवले आहे. २०२७ मध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाबसह काही महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला शह देण्यासाठी विरोधकांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून ८ जून रोजी राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत आघाडीतील १५ घटकपक्षांतील प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्याविषयी…

इंडिया आघाडीची बैठक कशासाठी?

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांसह केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीत भाजपाने एकहाती सत्तास्थापन केली, तर तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने अभूतपूर्व यश मिळवले. इंडिया आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ केरळमध्ये विजय मिळवला आला. या निकालानंतर इंडिया आघाडीची नव्याने रणनीती आखण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. त्याचाच एक भाग म्हणून ८ जून रोजी नवी दिल्लीत १५ विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या भविष्यातील वाटचालीसह देशातील विविध राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे समजते.

बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

दी इंडियन एक्सप्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीतील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’ येथे इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने या बैठकीबाबत माहिती देताना सांगितले की, या बैठकीत ‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य आणि सध्या देशात सुरू असलेल्या विविध घडामोडींवर सविस्तर चर्चा केली जाईल. विशेषतः परीक्षांमधील गैरप्रकार, वाढती महागाई, इंधनाचे दर आणि देशासमोरील आर्थिक संकटे यांसारख्या जनसामान्यांशी निगडित महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा होईल. इंडिया आघाडीसमोरील आव्हाने, आगामी निवडणुकांची तयारी आणि केंद्र सरकारविरोधातील संयुक्त भूमिका यावरही या बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बैठकीला कोणकोणते पक्ष राहणार उपस्थित?

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व या बैठकीसाठी विरोधी गोटातील ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधत असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि डाव्या पक्षांसह एकूण १५ प्रमुख पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अलीकडील विधानसभा निवडणुकांनंतर इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपाने तृणमूल काँग्रेसचा पराभव केला, तर तमिळनाडूमध्ये काँग्रेसने दीर्घकालीन मित्रपक्ष द्रमुकची साथ सोडून जोसेफ विजय यांच्या पक्षाशी हातमिळवणी केली केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीने डाव्या पक्षांचा पराभव केला. या घडामोडींमुळे इंडिया आघाडीतील राजकीय समीकरणांवर परिणाम झाल्याचे मानले जात आहे.

राहुल गांधींच्या वक्तव्याने प्रादेशिक पक्ष सावध

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर विरोधी पक्षांमध्ये राहुल गांधी यांच्या एका वक्तव्याचीही चर्चा सुरू आहे. भाजपा-आरएसएसविरोधात कोणताही पक्ष स्वतंत्रपणे उभा राहू शकत नाही आणि त्यांचा पराभव करण्याची क्षमता केवळ काँग्रेसकडेच आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. या विधानाची अनेक प्रादेशिक पक्षांनी गंभीर दखल घेतल्याचे सांगितले जाते. पश्चिम बंगालमधील पराभवानंतर इंडिया आघाडीतील समीकरणांमध्ये काही बदल झाल्याचेही दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पराभवानंतर तुलनेने मवाळ भूमिका स्वीकारल्याचे दिसत आहे.

‘द्रमुक’ आणि ‘आप’ फिरवणार बैठकीकडे पाठ?

सूत्रांच्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी या ८ जून रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत विरोधी पक्षांच्या एकजुटीचा संदेश देण्याबरोबरच आगामी राजकीय रणनीतीवर महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे तमिळनाडूत काँग्रेसने जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर नाराज असलेले द्रमुकचे नेते या बैठकीकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसकडून या बैठकीत विजय यांच्या पक्षातील नेत्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने यापूर्वीच इंडिया आघाडीपासून दुरावा ठेवला असल्यामुळे तेही या बैठकीत सहभागी होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे.

इंडिया आघाडीची स्थापना नेमकी कधी झाली?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला फटका देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. आघाडीची पहिली बैठक २३ जून २०२३ रोजी बिहारच्या पाटणा शहरात झाली होती. या बैठकीचे नेतृत्व बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले होते आणि त्यात भाजपाविरोधातील १५ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. दरम्यान, विरोधकांच्या या एकजुटीमुळे ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला निवडणुकीत मोठे अपयश आले होते. २०१४ नंतर पहिल्यांदाच भाजपाला स्वबळावर बहुमता आले नाही आणि त्यांना केवळ २३० जागांवरच समाधान मानावे लागले. दुसरीकडे इंडिया आघाडीने तब्बल २३४ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये काँग्रेसने ९९, समाजवादी पार्टीने ३७ आणि तृणमूल काँग्रेसने २९ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या होत्या.