Premium

इंडिया की एनडीए? मायावतींनी भाजपाशी हातमिळवणी केल्यास काँग्रेस, समाजवादी पार्टीला बसणार फटका!

इंडिया आघाडीतील नेत्यांनी मायावती यांच्याशी संपर्क साधलेला आहे. आघाडीत सहभागी होण्यासंदर्भात मायावती यांच्याशी बोलणी सुरू आहेत.

mayawati
मायावती (Twitter/@Mayawati)

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाने आघाडी केली आहे. या आघाडीत एकूण २८ पक्ष आहेत. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचाही या आघाडीत समावेश आहे. दलित मतदारांचा पाठिंबा असलेला बहुजन समाज पार्टी (बसपा) हा पक्ष मात्र इंडिया आघाडीचा भाग नाही. काही दिवसांपासून बसपाच्या सर्वेसर्वा इंडिया आघाडीविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत; तर दुसरीकडे भाजपाबाबतचा त्यांचा सूर काहीसा नरमला आहे. याच कारणामुळे त्या भविष्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे विरोधकांकडून मायावती यांना इंडिया आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायावती यांच्या ‘इंडिया’मधील प्रवेशासाठी विरोधकांचे प्रयत्न

इंडिया आघाडीतील नेत्यांनी मायावती यांच्याशी संपर्क साधलेला आहे. आघाडीत सहभागी होण्यासंदर्भात मायावती यांच्याशी बोलणी सुरू आहेत. मात्र, आतापर्यंत मायावती यांनी विरोधकांच्या या आवाहनाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. मायावती सध्या तरी इंडिया आघाडीत सामील होण्यास उत्सुक नसल्या तरी विरोधकांचे प्रयत्न सुरूच आहेत. याबाबत जदयू पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी प्रतिक्रिया दिली. “जदयू पक्षाचे नेते नितीश कुमार यांना देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे वाटते. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीदेखील असेच मत व्यक्त केलेले आहे. आता मायावती यांची वेळ आहे. आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. भाजपा आणि इंडिया अशा दोघांविरोधात लढायचे की इंडिया आघाडीत येऊन भाजपाचा सामना करायचा हे त्यांनी ठरवावे. कारण- कोणीही एकटा भाजपाचा सामना करू शकत नाही. त्यांनी इंडिया आघाडीत येण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू. मात्र, त्या काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांवर सातत्याने टीका करीत असतील, तर त्यांना इंडिया आघाडीत घेणे कठीण होऊन बसेल,” असे के. सी. त्यागी म्हणाले.

२०२२ साली समाजवादी पक्षाला बसला होता फटका

इंडिया आघाडीच्या या प्रस्तावावर बसपाच्या एका नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली. बसपाने इंडिया आघाडीत सामील न होण्याचा निर्णय घेतल्यास तोटा होण्याची शक्यता आहे, असे या नेत्याने म्हटले. “स्वत:च्या ताकदीवर निवडणूक जिंकण्याची सध्या बसपाची स्थिती नाही; मात्र हा पक्ष इतर पक्षांना नुकसान पोहोचवू शकतो. उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बसपा पक्षाला कमीत कमी १५०० मते मिळू शकतात. २०२२ साली बसपा पक्षाने एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला होता. बसपा पक्षाच्या मुस्लीम उमेदवारांमुळे समाजवादी पक्षप्रणीत युतीला अनेक जागांवर फटका बसला होता. त्याच जागांवर भाजपाच्या उमेदवारांचा विजय झाला होता,” असे हा नेता म्हणाला.

मायावती यांचा अनेक वेळा भाजपाला पाठिंबा

मायावती भविष्यात काय निर्णय घेणार? हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, त्यांनी घेतलेले काही राजकीय निर्णय हे भाजपाच्या हिताचेच ठरलेले आहेत. नुकताच त्यांनी महिला आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा दिला. पाठिंबा देताना त्यांनी या आरक्षणात ओबीसी महिलांना स्वतंत्र आरक्षण कोटा हवा, अशी मागणी केली. जी-२० परिषदेदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या एका निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत, असे लिहिलेले होते. त्यावरून चांगलाच वाद रंगला होता. यावेळीदेखील त्यांनी थेट भाजपाला लक्ष्य करण्याचे टाळत विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका केली होती. विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव इंडिया ठेवून भाजपाला संविधानाशी छेडछाड करण्याची संधी दिली आहे, असे तेव्हा मायावती म्हणाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून रोजी एका सभेदरम्यान समान नागरी कायद्याच्या गरजेबाबत भाष्य केले होते. त्यानंतर मायावती यांनी काहीशी वेगळी भूमिका घेत या कायद्याचे समर्थन केले होते. आम्ही समान नागरी कायद्याच्या विरोधात नाही; मात्र भाजपाला ज्या पद्धतीने हा कायदा लागू करायचा आहे, त्याचे आम्ही समर्थन करीत नाही, असे मायावती म्हणाल्या होत्या.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा

याच वर्षाच्या २५ मे रोजी विरोधकांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. मायावती यांनी मात्र हा बहिष्कार टाकणे चुकीचे आहे, असे म्हणत या कार्यक्रमात आम्ही सहभागी होणार, असे सांगितले होते. २०२२ साली बसपाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. ऑगस्ट २०२२ साली त्यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांनाही पाठिंबा दिला होता.

… तर विरोधकांच्या इंडिया आघाडीचे होईल नुकसान

दुसरीकडे भाजपानेदेखील मायावती यांच्याबाबत आतापर्यंत मवाळ धोरण स्वीकारलेले आहे. भाजपाचे नेते मायावती यांच्याऐवजी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या नेत्यांना लक्ष्य करीत असतात. मायावती यांच्यावर टीका केल्यास दलित मतदार दूर होतील, अशी भीती भाजपाला वाटते. अशा स्थितीत मायावती यांनी एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फटका समाजवादी पार्टी, काँग्रेस या पक्षांना पर्यायाने इंडिया आघाडीला बसू शकतो. त्यामुळे मायावती आगामी काळात नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India alliance trying convince mayavati but will bsp join nda alliance prd

First published on: 30-09-2023 at 12:50 IST
Next Story
मराठा आरक्षण आणि ओबीसी प्रश्नावरून सरकार कात्रीत