INDIA bloc on NCP merger अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. विलीनीकरणाच्या चर्चेपासून शरद पवारांनी स्वतःला दूर ठेवले असले तरी विलीनीकरण झाल्यास शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात इंडिया आघाडीतील नेत्यांनीही विलीनीकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विलीनीकरण झाल्यास शरद पवार गट इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? असाही प्रश्न निर्माण होत आहे.

शरद पवार गट इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यास काय?

दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) एका वरिष्ठ नेत्याने यावर बोलताना प्रश्न केला आणि म्हटले की, “यात आम्ही काय करू शकतो? दोन्ही गट आणि पवार कुटुंबालाच याबाबत निर्णय घ्यावा लागेल. कुटुंबातील एका वरिष्ठ सदस्याचे निधन झाले आहे, त्यामुळे आम्ही सध्या या विषयात ढवळाढवळ करू इच्छित नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि जशी परिस्थिती बदलेल तसे पाऊल उचलू.”

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाचे धक्कादायक वृत्त येण्यापूर्वी ८ फेब्रुवारीलाच राष्ट्रवादीचे दोन्ही गट विलीनीकरणाची घोषणा करणार होते. भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्याने असेही म्हटले की, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडणे हा मोठा फटका नसेल. “एखाद्याच्या जाण्याचा युतीवर सकारात्मक परिणामही होऊ शकतो. राजकारण इतके गतिमान आहे की आधीच अंदाज वर्तवणे कठीण आहे,” असे त्यांनी नमूद केले.

काँग्रेस नेत्यांची भूमिका काय?

महाराष्ट्रातील एका काँग्रेस खासदाराने सांगितले की, जर शरद पवार आणि त्यांचा पक्ष विरोधी आघाडी सोडत असेल तर ते मोठे नुकसानदायी ठरेल. राष्ट्रवादीचे संस्थापक (शरद पवार) हे महाराष्ट्रात विरोधी ऐक्याचे मुख्य सूत्रधार होते. त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेस आणि शिवसेना (फुटीनंतरची शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन करण्यात मदत केली होती.

“सुप्रिया सुळे संसदेत उत्तम वक्त्या आहेत आणि दिल्लीसह महाराष्ट्रात त्यांचा मोठा आदर आहे. शरद पवारांबद्दल मी काय बोलणार? त्यांचे राजकीय स्थान कदाचित थोडे कमी झाले असेल, तरीही ते एक दिग्गज नेते आहेत आणि ते ज्या युतीमध्ये किंवा पक्षात असतील, ती त्यांची मोठी संपत्ती असेल. त्यांनी साथ सोडली तर ते विरोधकांसाठी मोठे नुकसान असेल, पण सध्यातरी आम्ही फार काही करू शकत नाही,” असे महाराष्ट्रातील एका खासदाराने सांगितले.

राज्यातील काँग्रेसच्या आणखी एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाने अद्याप पवार कुटुंबाशी कोणताही संपर्क साधलेला नाही. “राज्य युनिटमध्ये आम्ही आधीच ठरवले आहे की पवार कुटुंबाशी आता बोलण्यात काही अर्थ नाही. ते काय निर्णय घेतात आणि काय करतात ते पाहूया आणि त्यानुसार आगामी काळात पावले उचलली जातील. विलीनीकरणाची माहिती अद्याप कोणालाही नाही.”

शिवसेनेतील नेत्यांचे म्हणणे काय?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, ही अशा चर्चांची वेळ नाही. “ते सध्या दुःखात आहेत. हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि या क्षणी बोलण्यासारखे काय आहे?” शिवसेनेच्या दुसऱ्या एका वरिष्ठ नेत्याने राऊत यांच्या विधानाचे समर्थन करत म्हटले, “काही दिवसांपूर्वीच कुटुंबात मृत्यू झाला आहे. कुटुंब अजूनही दुःखात असताना राजकीय चर्चा करणे मला योग्य वाटत नाही.”

इतर पक्षांची भूमिका

इंडिया आघाडीचा घटक असलेल्या समाजवादी पक्षाच्या एका राज्यसभा खासदाराने सांगितले की, आघाडी किंवा काँग्रेस सध्या काहीही करू शकत नाही. “एखाद्या मित्रपक्षाशी काही राग किंवा नाराजी असती, तर आम्ही त्यांच्याशी बोलू शकलो असतो, पण तसे नाहीये. तिथे जे घडत आहे ते त्यांचे अंतर्गत प्रश्न आहेत. दोन कुटुंबे आणि दोन गट एकत्र येण्याचा इंडिया आघाडीशी काहीही संबंध नाही, मग आम्ही त्यांच्याशी चर्चा कशी सुरू करू शकतो?”

ते पुढे म्हणाले, “तसेच मोठ्या आघाडीत कोणत्याही पक्षाला पूर्ण स्वायत्तता असते. एखादा पक्ष अंतर्गत काय करतो, याचा युतीशी संबंध नसतो.” राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) कडे ८ लोकसभा आणि २ राज्यसभा खासदार आहेत. जर विलीनीकरण झाले, तर संयुक्त पक्षाकडे ९ लोकसभा खासदार आणि उच्च सभागृहात (राज्यसभा) ५ सदस्य असतील, ज्यामुळे संसदेत एनडीएचे संख्याबळ वाढेल.

मात्र, सध्या शरद पवारांच्या वक्तव्यावरून ही प्रक्रिया थांबल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे, महत्त्वाचे निर्णय आता त्यांच्या गटाला विश्वासात न घेताच घेतले जात असल्याने कुठेतरी त्यांची नाराजी असल्याचे चित्र आहे. सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी झालेली निवड ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची अंतर्गत बाब असून त्याबाबत आपल्या गटाशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या टिप्पणीमुळे सत्ताधारी राष्ट्रवादीत विलीनीकरणाबाबत असलेला विरोध उघड झाला आहे. राष्ट्रवादीतील एका गटाला विलीनीकरण नको आहे, कारण त्यांना स्वतःचे अधिकार, सरकारमधील स्थान आणि पक्षावरील नियंत्रण गमावण्याची भीती आहे; त्यामुळे पुढे काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.