पंजाब विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी शिल्लक असतानाच अमृतपाल सिंग यांच्या ‘वारिस पंजाब दे’ या पक्षाने शीख मतदारांमध्ये आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. त्याचाच भाग म्हणून पक्षाने फतेहगढ साहिब जिल्ह्यातील बस्सी पठणा मतदारासंघातून सतवंत सिंग यांना उमेदवारी जाहीर केली. सतवंत हे १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या केहर सिंग यांचे पुत्र असल्याचे सांगितले जाते. या हत्याकांडात सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांनाही खलिस्तान समर्थक पक्षात महत्त्वाचे स्थान देण्यात आल्याचे समजते. ‘वारिस दे पंजाब’ पक्षाचे सध्याचे फरीदकोटचे खासदार सरबजीत सिंग खालसा हेदेखील इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांपैकी एक असलेल्या बेअंत सिंग यांचे पुत्र आहेत. त्याशिवाय पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य सुखविंदर सिंग यांचे नातेही माजी पंतप्रधानांच्या मारेकऱ्यांशी थेटपणे जुडलेले आहे.
सोमवारी फतेहगड साहिब जिल्ह्यातील बस्सी पठाणा मतदारसंघातून सतवंत सिंग यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. यावेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष व अमृतपाल सिंग यांचे वडील तरसेम सिंग यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘वारिस पंजाब दे’ पक्षाचे राजकारण केवळ सत्ता मिळवण्यापुरते मर्यादित नाही. पंथिक तत्त्वे, पंजाबचे हक्क तसेच शीख समाजासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबांचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे. सतवंत सिंग यांची उमेदवारी म्हणजे पक्ष बलिदानी कुटुंबांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या आरोपांना दिलेले थेट चोख प्रत्युत्तर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यादरम्यान खलिस्तान समर्थक पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी बँक मॅनेजर असलेले सतवंत सिंग यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला. कुटुंबाच्या समान पार्श्वभूमीमुळे सरबजीत सिंग खालसा, सुखविंदर अघवान आणि मी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र भेटत आलो आहोत. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही सरबजीत सिंग यांचा जोमाने प्रचार केला होता. आता खालसा आणि अघवान या दोघांनीही पक्षाच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची शिफारस केली आहे, असे सतवंत सिंग यांनी सांगितले.
फरीदकोटचे खासदार सरबजीत सिंग खालसा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, गेल्या आठवड्यात अगवान यांची पक्षाच्या संसदीय मंडळावर झालेली नियुक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. हे मंडळ पंजाबमधील सर्व ११७ विधानसभा मतदारसंघांतील योग्य उमेदवारांची निवड करणार आहे. बलिदानी कुटुंबांसाठी हा मोठा सन्मान असल्याचेही मतही त्यांनी व्यक्त केले. दुसरीकडे- केहर सिंग यांच्या कुटुंबाकडे आतापर्यंत पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते; पण आता त्यांना पक्षाने बस्सी पठाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अत्यंत शिक्षित आणि विचारशील सतवंत सिंग हे शहीद केहर सिंग यांचे पुत्र आहेत. आजपर्यंत पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेल्या या कुटुंबातील सतवंत सिंग यांना बस्सी पठाणा मतदारसंघातून पक्षाची पहिली उमेदवारी दिली आहे. स्वतःला पंथिक म्हणवणाऱ्या पक्षांनी यापूर्वी अशा कुटुंबांना एवढा सन्मान कधीच दिला नाही. या कुटुंबांनी शीख समाजासाठी मोठे बलिदान दिले आणि प्रचंड संकटे सोसली असल्याची भावना सुखविंदर सिंग अघवान यांनी व्यक्त केली. तसेच, त्यांनी तरसेम सिंग, अमृतपाल सिंग आणि पक्षाच्या नेतृत्वाचे आभारही मानले.
गेल्या काही दिवसांपासून वारिस पंजाब दे पक्षावर बलिदानी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात होता. शिवसेना नेते सुधीर सुरी हत्या प्रकरणातील आरोपी संदीप सिंग यांचा भाऊ मनदीप सिंग आणि बनावट चकमक प्रकरणात दोषी ठरलेले माजी पोलिस अधिकारी सुबा सिंग यांनी ही टीका केली होती. गेल्या वर्षी मनदीप सिंग यांनी ‘वारिस पंजाब दे’ आणि अकाली दल (अमृतसर) पक्षांच्या पाठिंब्याने तरनतारन विधानसभा पोटनिवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, शिरोमणी अकाली दल (पुनरुज्जित) गटाचे प्रमुख व अकाल तख्तचे माजी जथेदार गियानी हरप्रीत सिंग यांनी सर्व अकाली गटांना एकत्र येण्याचे आणि ‘राजकीय कैदी व बलिदानी कुटुंबांसाठी’ काही विधानसभा जागा राखून ठेवण्याची मागणी केली आहे. शीख समाजाच्या सामूहिक हितांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांनी पंथिक एकता राखण्याचे आवाहन करताना त्यांनी हे आवाहन केले आहे. बलिदानी कुटुंबे आणि शीख राजकीय कैद्यांना योग्य सन्मान आणि राजकीय सहभाग देणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. जागावाटपाच्या वेळी राजकीय कैदी आणि बलिदानी कुटुंबांना एकूण ३० टक्के जागा मिळायला हव्यात. आपण या कुटुंबांना विसरलो, तर तो समाजाशी केलेला विश्वासघात आणि फसवणूक ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
अमृतपाल सिंग यांच्या लोकप्रियतेमुळे वारिस पंजाब दे पक्षाला मोठा जनाधार मिळाला आहे. मात्र, खडूर साहिब लोकसभा मतदारासंघातून निवडून आलेले अमृतपाल सिंग २०२३ पासून दिब्रुगड तुरुंगात आहेत. त्यातच सरबजीत सिंग यांच्या निवडणूक विजयामुळे पक्षाची ताकद वाढली असली, तरी पक्षाकडे सक्षम स्थानिक नेते आणि मजबूत संघटनात्मक बांधणीचा अभाव आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी तसेच पंथिक मतदारांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी वारिस पंजाब देकडून इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या कुटुंबीयांशी जवळीक वाढवण्याबरोबरच ओळखीच्या चेहऱ्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा प्रयत्न पंजाबमधील पंथिक राजकारणात मोठ्या उलथापालथीच्या काळात होत आहे. सुखबीर सिंग बादल यांच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दलाचा (SAD) राजकीय प्रभाव झपाट्याने कमी झाला आहे. त्याचवेळी शिरोमणी अकाली दल (पुनरुज्जित) कडूनही बादल यांच्या पक्षाला मोठे आव्हान मिळत आहे. जून महिन्यात वारिस पंजाब दे पक्षाने मोठी राजकीय खेळी केली. दाखा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनप्रीत सिंग अयाली यांनी पक्षात खेचून आणले. अयाली यांनी २०२२ ची विधानसभा निवडणूक शिरोमणी अकालीच्या तिकिटावर जिंकली होती. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला मोठी बळकटी मिळू शकते, असा वरिष्ठ नेत्यांना विश्वास आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारिस पंजाब दे पक्षासमोर प्रामुख्याने तीन मोठी आव्हाने आहेत. त्यातील पहिले आव्हान हे जागावाटपाचे असून बादल यांच्या नेतृत्वाखालील अकाली दलाला विरोध करणारे छोटे पक्ष आणि धार्मिक संघटना विधानसभा जागावाटपात मोठा वाटा मागत आहेत. मात्र, निवडणुकीत अद्याप स्वतःची ताकद सिद्ध न केलेल्या मित्रपक्षांना मोठी राजकीय जागा देण्याबाबत वारिस पंजाब दे सावध आहे. सध्या या पक्षाकडे दोन खासदार आणि एक आमदार आहेत. याउलट बादल यांच्या पक्षाकडे एक खासदार आणि एक आमदार आहे. दुसरे आव्हान म्हणजे बादल समर्थक नेत्यांना पक्षात घेण्याचा धोका आहे. नाराज अकाली नेत्यांना आपल्या गोटात घेतल्यास पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. कारण या नेत्यांवर यापूर्वी बादल यांच्या गटासोबत राहिल्याची राजकीय पार्श्वभूमी आहे. तिसरे आणि महत्त्वाचे आव्हान म्हणजे वारिस पंजाब दे पक्षाकडे संघटनात्मक यंत्रणेचा अभाव आहे. विधानसभा निवडणुकीत मोठा प्रभाव पाडण्यासाठी आवश्यक असलेले बूथ एजंट आणि तळागाळातील संघटनात्मक नेटवर्क पक्षाकडे अद्याप पुरेसे नाही. पक्षाची लोकप्रियता आणि राजकीय ताकद मोठ्या प्रमाणावर अमृतपाल सिंग यांच्या प्रभावावर अवलंबून आहे. यादरम्यान अमृतपाल सिंग यांच्या अनुपस्थितीचा विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होईल का, असा प्रश्न मनप्रीत सिंग अयाली यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते तुरुंगात असतानाही पक्षाला चांगला जनाधार मिळत आहे. एकदा ते बाहेर आले की काय होईल हे तुम्हाला माहीतच आहे, असे मनप्रीत सिंग यांनी म्हटले आहे. शिरोमणी अकाली दलाने पुन्हा भाजपासोबत युती केल्यास त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
