हर्षद कशाळकर
अलिबाग- राज्यसरकारमध्ये सहभागी होताच, आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात निधीचा ओघ सुरू झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेली कामे मार्गी लावण्याचा धडाकाही सुरु झाला आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप आमदारांच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरण्यास सुरुवात झाली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक मोठा गट राज्यातील भाजप, शिवसेना युतीत सहभागी झाला. अजित पवारांसह नऊ जणांची राज्य सरकारमध्ये वर्णी लागली. यात आदिती तटकरे यांचाही समावेश झाला. मंत्रिमंडळातील सहभागामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली. जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभेचे आमदार सत्ताधारी झाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

महाविकास आघाडी सरकार गडगडल्याने आदिती तटकरे यांची मतदारसंघात मोठी कोंडी झाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर कामांवर ब्रेक लागला होता. करोडो रुपयांची कामे मंजूर असूनही होत नव्हती. नवीन विकास निधीही मिळत नव्हता. स्थगिती आदेशांमुळे महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भवितव्य अडचणीत आले होते.

आणखी वाचा-लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू एनडीएत जाणार? माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा दावा

शिवसेना भाजपच्या महायुती सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या सहभागानंतर परिस्थिती बदलली आहे. आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात तर स्थान मिळालेच, त्याचबरोबर मतदारसंघात निधीचा ओघही सुरू झाला आहे. माणगाव येथे विभागीय क्रिडा संकुल उभारणीच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तर श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्र, तळा येथील खारभूमी संशोधन केंद्र, रोहा येथील काढणी पश्चात तंत्रज्ञान महाविद्यालयाचे श्रेणी वर्धन करण्याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी हालचाली सूरू केल्या आहेत. रोहा तालुक्यातील जामगाव येथे चिंतामणराव देशणुख जैव विविधता केंद्र उभारण्यासाठी मंत्रालय स्तरावरून सूत्र हलायला लागली आहेत.

येवढेच नव्हे तर आदिती यांनी पुरवणी अर्थसंकल्पात श्रीवर्धन मतदा संघातील विकासकामांसाठी १४७ कोटींच्या कामांसाठी निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा श्रीवर्धन मतदारसंघाकडे सरकला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतील कामांना महायुती सरकारने स्थगिती दिली होती. यात श्रीवर्धन मतदारसंघातील सर्वाधिक कामांचा समावेश होता. ही स्थगिती उठल्याने पर्यटन विकास योजनेतील ७४ कोटी रुपयांची कामे मार्गी लागणार आहे. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघावर लागलेले स्थगिती आणि विकास निधीला लागलेले ग्रहण सुटले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनही श्रीवर्धन मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी निधी आणला आहे. त्यामुळे तीनही बाजूंनी विकास निधीचा ओघ श्रीवर्धनकडे सुरू झाला आहे.

आणखी वाचा-यवतमाळ जिल्हा बँकेचा निकाल महाविकास आघाडीच्या एकजुटीला दिशा देणारा

गेली वर्षभर सत्ते अभावी बॅकफूटवर असलेले तटकरे कुटूंब सत्तेचे पाठबळ मिळाल्याने कमालीचे आक्रमक आणि गतिमान झाल्याचे यामुळे पहायला मिळते आहे. पण तटकरे कुटूंब आणि आदिती तटकरे यांची ही गतिमानता शिवसेना आणि भाजप आमदारांसाठी अस्वस्थता निर्माण करणारी ठरत आहे.

शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदिती तटकरे यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लागली होती. तर तीन वेळा आमदार होऊनही शिवसेनेच्या भरत गोगावले यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे शिवसेना आमदार नाराज होते. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्याने जिल्ह्याचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असावा असा आग्रह तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लावून धरला होता. मात्र उध्दव ठाकरे यांनी तो न जुमानता आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्री पदाची सुत्र दिली. इथेच या वादाची पहिली ठिणगी पडली होती. नंतर कधी निधी वाटपावरून, कधी श्रेयवादावरून, तर कधी शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करण्यावरून वाद होत राहीले. त्यामुळे गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या तीनही आमदांरानी पालकमंत्री हटावचा नारा दिला होता. पण उध्दव ठाकरे यांनी ही मागणी धुडकावून लावली होती. यामुळेच शिवसेनेच्या तीनही आमदारांनी शिंदे गटात जाऊन उठाव केला होता आणि महाविकास आघाडी सरकार उलथवून लावले होते. आता वादाचे निमित्त ठरलेल्या आदिती तटकरे महायुतीच्या मंत्री झाल्याने शिवसेनेचे आमदार पुन्हा अस्वस्थ आहेत. आदिती तटकरे पालकमंत्री नकोच अशी मागणी त्यांनी केली आहे. पण पालकमंत्रीपद मिळाले नसले तरी मंत्रीपदाच्या जोरावर निधीचा ओघ तर वाढला आहेच. पण त्याचवेळी प्रशासनावरच वचक निर्माण करत विकासाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा श्रीवर्धनकडे वळवला आहे.

Story img Loader