scorecardresearch

नागपूरमध्ये भाजप अंतर्गत धुसफूस 

शिक्षक परिषदेने आधीच उमेदवार जाहीर केल्याने पक्षाची अडचण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागपूरमध्ये भाजप अंतर्गत धुसफूस 
नागपूर भाजप फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर: शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षात सर्वच काही आलबेल आहे,असे चित्र नाही. शिक्षक परिषदेचे उमेदवार व विद्यमान आमदार नागोराव गाणार यांना पाठिंबा देण्यास भाजपच्या एका मोठ्या वर्गाचा विरोध होता, पण शिक्षक परिषदेने आधीच उमेदवार जाहीर केल्याने पक्षाची अडचण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोजून दहा दिवस शिल्लक असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत खरी लढत शिक्षक परिषद, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि शिक्षक भारती या तीन शिक्षकांच्या संघटनांमध्ये असली तरी या तीनही संघटनांना पाठिंबा देणारे राजकीय पक्ष अनुक्रमे भाजप, काँग्रेस व लोकभारती यांची प्रतिष्ठा दावणीला लागली आहे.

हेही वाचा >>> आमच्याकडे लक्ष द्या… नाराज सातव गटाची साद

सध्या या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील दुफळीचा अधिक गाजावाजा होत असला तरी भाजपमधील धुसफूसही हळूहळू का होईना चव्हाट्यावर येऊ लागली आहे. त्याला कारणीभूत ठरली आहे ती गाणार यांची उमेदवारी.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरमधील पक्षाच्या बड्या नेत्यांचा गाणार यांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यांनी यावेळी निवडणूक न लढता ही जागा भाजपसाठी सोडावी,अशी या नेत्यांची इच्छा होती. गाणार यांचे मन वळवण्यात आपल्याला यश येईल कारण त्यांना सलग दोन वेळा निवडून आणण्यास भाजपचा मोलाचा वाटा होता, असे भाजप नेत्यांना वाटले होते. ही बाब गृहित भाजप या जागेसाठी नावांची चाचपणी सुरू केली होती. त्यात सर्वात अग्रस्थानी माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे नाव होते. मात्र गाणार यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह शेवटपर्यंत कायम ठेवला.त्यामुळे भाजपचा नाईलाज झाला.

हेही वाचा >>> आभासी चलन प्रकरणात जालन्यातील आजी-माजी आमदार समोरासमोर

गाणार यांच्या विषयी नाराजी असण्याची अनेक कारणे आहेत भाजप ही निवडणूक लढणार याची कुणकुण लागताच शिक्षक परिषदेने गाणार यांच्या नावाची घोषणा करून भाजपकडे पाठिंब्यासाठी पत्रही पाठवणे ही बाब अनेक भाजप नेत्यांना आवडले नव्हते. या सर्व कारणांमुळेच गाणार यांना पाठिंबा देण्यास भाजपने उशीर लावला होता. पाठिंबा देण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या बैठकीतही अनेक आजी-माजी आमदारांनी गाणार यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. पण ऐनवेळी उमेदवार देण्याऐवजी भाजपने गाणार यांना पाठिंबा देण्याचा सुरक्षित पर्याय निवडला. मात्र नेत्यांची मने दुरावली आहे.

हेही वाचा >>> पदवीधर मतदारसंघात पदवीधरांचे प्रश्न बेदखल

गाणारांवर नाराज असलेला एक गट प्रचारापासून दूर होता. त्यामुळे वेळेत वेळ काढून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपुरात गाणारांसाठी सभा घ्यावी लागली. मात्र त्यानंतरही सर्व आलबेल असल्याचे चित्र नाही. त्यामुळे गाणार यांना वाटते तेवढी ही निवडणूक सोपी नाही, असे भाजपमधील सुत्रांचेच म्हणने आहे

भाजपमध्ये नाराजी नाही -भेंडे

नागपूरची जागा शिक्षक परिषदेचीच होती. यंदा त्यांच्याऐवजी भाजपने लढावी,अशी इच्छा काही नेत्यांची होती, असे झाले असते तर एका कार्यकर्त्याला संधी देता आली असती. पण परिषदेने त्यांचा उमेदवार जाहीर केला. त्याला भाजपने पाठिंबा दिला. यात नाराजीचा विषयच नाही, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 15:02 IST

संबंधित बातम्या