धुळे : सर्व पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना धुळ्यातील भाजपचे माजी खासदार डाॅ. सुभाष भामरे अजूनही लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून बाहेर पडलेले नसल्याचे बघायला मिळते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत धुळे महानगर भाजपचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाची खपली काढली गेली आणि डाॅ. भामरे यांच्यासह सर्वांच्या भावनांचा बांध फुटला. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बनावट मतदान झाले. त्यामुळे आपला पराभव झाला. त्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भामरे यांनी केली. हे ही वाचा. सुधारित वक्फ कायद्याला कडाडून विरोध; भाजप सरकार समाजात फूट पाडत असल्याचा आरोप भाजपच्या या अधिवेशनात विधानसभा निवडणूक तयारीच्यादृष्टीने ठोस कार्यक्रमाची पदाधिकारी, कार्यकर्त्यांंना अपेक्षा असताना लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल आणि कालातील त्रुटी याविषयीच काथ्याकूट करण्यात आली. रक्षा खडसे यांनी मात्र प्रत्येकाने मतभेद आणि वादविवाद बाजूला ठेवून पक्षासाठी काम करावे, असा सल्ला दिला. भाजप संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार काँग्रेसतर्फे करण्यात आला. संविधान कधीही बदलू शकत नाही, हे पटवून देण्यात भाजप कमी पडला. आपल्यातीलच काहीजण काँग्रेसच्या प्रचाराला बळी पडले, असे भाजपचे ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीसाठी निधीसह आवश्यक ते सर्व काही देऊनही काहींनी काम केले नाही, असा आरोप त्यांनी करताच माजी उपमहापौर नागसेन बोरसे यांनी आक्षेप घेतला. कुणी काम केले नाही, अशी विचारणा करत बोरसे यांनी त्यांचे नाव जाहीर करा, असे आव्हान दिले. गवळी विरुद्ध बोरसे यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाल्यानंतर भाजप युवा मोर्चाचे रोहित चांदोडे यांनीही आक्षेप घेतल्याने गोंधळ अधिकच वाढला. काही मिनिटांच्या या गोंधळातून भाजपमधील अंतर्गत गटबाजीचे दर्शन झाले. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी विचारमंथन होणे गरजेचे असताना लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावरच अधिकच चर्चा झाली. संघटन महामंत्री विजय चौधरी यांनीही त्यात भर घातली. लोकसभेचा पराभव पक्षाने गांभीयनि घेतला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. १७ हजार बनावट मतदान झाले आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई होईलच, पण डॉ. भामरे यांना न्याय देण्यासाठी पक्ष त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे ते म्हणाले. एका समाजाने काँग्रेसला मतदान केल्याचे मांडले. मोठ्या प्रमाणावर बनावट मतदान झाल्याने आपला पराभव झाला. त्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भामरे यांनी केली. हे ही वाचा. आर. आर. आबांच्या पुत्राची वाट बिकटच महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात कोणतेही ठोस काम झाले नाही. महायुतीच्या सरकारने मात्र सर्व योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोचविण्याचे काम केले. लोकसभेत ज्या चुका झाल्या, त्या सुधारुन आगामी काळात राज्यात महायुतीचे सरकार परत आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांनी केले. सर्वांनी मतभेद बाजूला ठेवावेत, हे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. भाजप प्रवक्ते संजय शर्मा यांनी लोकसभेप्रमाणेच आताही मराठा आरक्षणावरून विरोधकांकडून अपप्रचार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आणून दिले.