उत्तर प्रदेश : बसपा मध्ये धुसफुस, मायावती यांनी सतीश मिश्रा यांना निर्णय प्रक्रियेतून डावलले

एकेकाळी उत्तर प्रदेशात प्रमुख सत्ताधारी पक्ष असणाऱ्या बसपाला फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त एकच जागेवर समाधान मानावे लागले होते.

उत्तर प्रदेशात बसपामध्ये पक्षांतर्गत वाद आता ठळकपणे समोर येऊ लागले आहेत. बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा हे पक्षात नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या गेल्या दोन महत्त्वाच्या संघटनात्मक बैठकांना ते अनुपस्थित होते. नुकत्याच झालेल्या आझमगड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बसपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नावही गायब होते, सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांना बाजूला केले आहे. बसपामधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मायावतींनी सतीश मिश्रा यांना पक्षाच्या कायदेशीर कक्षाकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. बसपचा ब्राह्मण चेहरा असणारे सतीश मिश्रा हे पूर्वी पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात प्रमुख भूमिका बजावत होते. पक्षाच्या कायदेविषयक बाबी तेच हाताळत असत.

एकेकाळी उत्तर प्रदेशात प्रमुख सत्ताधारी पक्ष असणाऱ्या बसपाला फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त एकच जागेवर समाधान मानावे लागले होते. मायावती यांनी आतापर्यंत लखनौमध्ये पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि राज्य पदाधिकाऱ्यांच्या तीन बैठका घेतल्या. सतीश मिश्रा यापैकी फक्त २७ मार्च रोजी झालेल्या पहिल्या बैठकीला उपस्थित होते  २९ मे आणि ३० जून रोजी झालेल्या इतर दोन बैठकांना ते अनुपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले. बसपा नेत्यांच्या एका गटाने मिश्रा यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते अनुपस्थित असल्याचे संगितले असले तरी पक्षांतर्गत कुरबुरी स्पष्टपणे जाणवत आहेत. बसपाच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, “मिश्रा यांना संघटनात्मक बैठका न घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना राजकीय गोष्टींपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यांना केवळ पक्षाच्या कायदेशीर कक्षाकडे लक्ष देण्यास सांगितले आहे”. 

याबाबत ‘ द इंडीयन एक्सप्रेस’ने मिश्रा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन  किंवा मेसेजला प्रतिसाद दिला नाही. एका बीएसपी नेत्याने सांगितले की, यूपी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या निराशाजनक कामगिरीमुळे मायावती सतीश मिश्रा यांच्यावर नाराज झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण प्रचार यंत्रणा मिश्रा यांनी हाताळली होती. पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरा सुद्धा केला होता. ब्राह्मण समाजाला पक्षाशी जोडून सोशल इंजिनियरिंग करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच होती. निवडणुकीच्या काळात त्यांनी राज्यभरात ५५ जाहीर सभांना संबोधित केले होते. बसपामधील दुसऱ्या एका नेत्याने सांगीतले की “मिश्रा यांचे पंख कापण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. मिश्रा यांना दूर सारून दलितांसाठी बसपा हाच एकमेव पर्याय असून मायावती याच त्यांच्या एकमेव नेत्या आहेत हे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे”.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Internal dispute between bsp is increasing pkd

Next Story
निषेधाच्या सुरानंतर मतदारसंघात बंडखोर आमदारांचे शक्तिप्रदर्शन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी