Maharashtra Top Political News : रायगड जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिंदे गटाला सत्तेतून दूर ठेवण्याची तयारी भाजपाने केल्याची माहिती सूत्रांनी दिली… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना दिली… अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर शिंदे गट सतर्क झाला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला… विदर्भातील दोन बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करण्याची तयारी केल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली… राज्यात हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनीच घेतला असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेत पुरावे दाखवले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदे गटाला सत्तेतून दूर ठेवण्याची तयारी?

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे शिंदे गट एकाकी पडल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेना शिंदे गटात सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला नाही तर शिवसेना शिंदे गटाला विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीत एकत्र असूनही शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आधीपासूनच वाद होते. त्यातच जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजपा नेते शिंदे गटाच्या विरोधात गेले आहेत. त्यापुढे शिवसेनेची साथ नकोच अशी भूमिका अनेक नेत्यांकडून बोलून दाखवली जात आहेत. जिल्हा परिषदेत भाजपाचाच अध्यक्ष बसणार असल्याचे भाजपाचे नेते आश्वाद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बड्या नेत्याच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये खळबळ

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपताच काँग्रेसमध्ये पुन्हा राजीनामा सत्र सुरू झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते दिग्गज नेते व चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अविनाश वारजूरकर आणि त्यांचे बंधू सतीश वारजुरकर यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षातील गटबाजीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे दोन्ही नेत्यांनी पत्रात म्हटले आहे. वारजूरक बंधूंनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आगामी काळात या दोघांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यातच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने वारजूरकर बंधू भाजपाच्या गोटात दाखल होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा : भाजपात लवकरच ४ हजार जणांचा प्रवेश, मनोज जरांगेंच्या इशाऱ्यामुळे महायुतीत खळबळ; वाचा ५ घडामोडी…

सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची सूत्रे

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे कोण सांभाळणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेच राष्ट्रवादीचे पुढील अध्यक्ष होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र अखेरीस आज (गुरुवार) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचा निर्णय़ जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा विश्वासही प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

अजित पवारांच्या निधनानंतर शिंदे गटाचा निर्णय

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर शिंदे गट सतर्क झाला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे गटातील नेत्यांनी यापुढे आपल्या दौऱ्यांसाठी ‘व्हीआरएस’ कंपनीच्या विमानांचा व हेलिकॉप्टरचा वापर करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाला अपघात झाला, त्या कंपनीच्या सुरक्षा मानकांबद्दल आणि तांत्रिक बाबींबद्दल सध्या मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून व्हीआरएस कंपनीची सेवा वापरणे धोक्याचे ठरू शकते, असा सूर आमदारांनी लावला होता. त्यांच्या भावना लक्षात घेऊन शिंदे यांनी या मागणीला तत्काळ मंजुरी दिली आहे.

हेही वाचा : शिंदे गटातील बड्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; भाजपापासून सावध राहण्याचा ठाकरेंचा सल्ला, वाचा ५ घडामोडी…

हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचाच?

राज्यात हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनीच घेतला असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधानसभेत पुरावे दाखवले. महापालिका निवडणुकीपूर्वी राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले होते. गुरुवारी हिंदी सक्तीवरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत सरकारला लक्ष्य केले. तोच धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे गटावर पलटवार केला. हिंदी सक्ती यावर वस्तुस्थिती मांडली पाहिजे. जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण आले तेव्हा उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. या विषयावर २१ सप्टेंबर २०२० रोजी मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १४ सप्टेंबर २०२१ रोजी या समितीने तत्कालीन ठाकरे यांच्याकडे १०१ पानी अहवाल सादर केला. त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. महाराष्ट्र शासनाने त्याचे ट्विट करत अहवाल स्वीकारतानाचा फोटो आहे, असे फडणवीस म्हणाले.