दिलीप घोष हे एकेकाळी पश्चिम बंगाल भाजपा युनिटचा चेहरा होते. परंतु, २०२१ मध्ये त्यांना राज्य पक्षप्रमुख पदावरून काढून टाकण्यात आले आणि तेव्हापासून पक्षातील त्यांचे महत्त्व कमी होत असल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोलकाता येथे पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये ते अनुपस्थित असल्याचे दिसून आल्याने त्यांच्या भाजपामधील भविष्यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपामध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याच्या चर्चादेखील सुरू आहेत. नेमका हा वाद काय? जाणून घेऊ…
प्रकरण काय?
- २९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीपूरद्वार येथे एक जाहीर सभा घेतली.
- या सभेत त्यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) प्रमुख व बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आणि राज्यातील २०२६ च्या निवडणुकीचा सूर निश्चित केला.
- १ जून रोजी शाह यांनी कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये भाजपा पक्षकार्यकर्त्यांची बैठक घेतली.
- या बैठकीला बंगाल केडरमधील सर्व नेते उपस्थित होते; मात्र दिलीप घोष हे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित नव्हते.
त्यांनी सांगितले की, त्यांना दोन्ही कार्यक्रमांना आमंत्रित केले गेले नाही. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल त्यांना माध्यमांकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितले, “सध्या पक्षात माझ्याकडे कोणतेही पद नाही. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की, मला आमंत्रित केले गेले नव्हते. प्रत्येक बैठकीला मला आमंत्रित केले जावे, हे आवश्यक नाही.” घोष म्हणाले की, बंगाल भाजपाचे आणखी एक माजी अध्यक्ष तथागत रॉयदेखील अमित शाह यांच्या सभेला उपस्थित नव्हते.
पक्षाच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये घोष यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारण्यात आले. त्यावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले, “घोष एक वरिष्ठ नेते आहेत; परंतु ते अनुपस्थित का होते याबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही.” एका नेत्याने सांगितले, “पश्चिम बंगाल भाजपा युनिटच्या सर्व राज्य समिती सदस्यांना अमित शाह यांच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आम्ही हे अधिकृतपणे सांगू शकत नाही; परंतु एक तर पक्ष दिलीप घोष यांच्यापासून स्वतःला दूर करू इच्छित आहे किंवा ते पक्षापासून दूर राहू इच्छित आहेत.” ते नेते पुढे म्हणाले, “आम्हाला असे वाटते की, येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपात कमीत कमी सहभाग असेल.”
दिलीप घोष यांच्या भोवतीचा वाद
दीर्घ काळापासून संघाचे कार्यकर्ते राहिलेल्या दिलीप घोष यांची २०१५ मध्ये भाजप नेतृत्वाने बंगाल युनिटचे नेतृत्व करण्यासाठी निवड केली होती. त्याच्या पुढील वर्षी म्हणजे २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत घोष यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची ताकद दिसून आली. तृणमूल काँग्रेसच्या आघाडीच्या काळात भाजपाने तीन जागा जिंकल्या आणि १७ टक्के मते मिळवली. दिलीप घोष यांनी मेदिनीपूरमध्ये त्यांची पहिली विधानसभा जागा जिंकली. पुढील तीन वर्षे घोष यांनी एका अशा संघाचे नेतृत्व केले, ज्याने बंगालमध्ये भाजपाचा पाया हळूहळू मजबूत केला.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कामाचे फळ मिळाले. त्या निवडणुकीत भाजपाने ४२ पैकी १८ लोकसभा जागा जिंकल्या. ती आतापर्यंत राज्यातील भाजपाची सर्वोत्तम कामगिरी होती. या निवडणुकीत घोष यांनी मेदिनीपूर लोकसभा जागा जिंकली. परंतु, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ममता बॅनर्जी यांचे सरकार उलथवण्यात अपयश आले. त्या निवडणुकीत भाजपाला २९४ पैकी फक्त ७७ जागा जिंकता आल्या. पराभवानंतर घोष यांच्या जागी खासदार सुकांत मजुमदार यांची नियुक्ती करण्यात आली. या निर्णयानंतरच घोष प्रसिद्धीच्या झोतात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
घोष यांच्या जवळचे मानले जाणारे सायंतन बसू व रितेश तिवारी यांसारखे नेते घोष यांना बाजूला केले जात असल्याची तक्रार करीत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतदेखील घोष यांना मेदिनीपूरमधून तिकीट देण्याऐवजी त्यांना बर्दवान-दुर्गापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले. घोष यांच्यासाठी हा सर्वांत मोठा धक्का असल्याचे सांगण्यात आले. या मतदारसंघात माजी क्रिकेटपटू व तृणमूल काँग्रेसचे उमेदवार कीर्ती आझाद यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
गेल्या काही महिन्यांत घोष यांच्यासाठी ही परिस्थिती अधिकच बिकट झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. दिघा येथे जगन्नाथ मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते ममता बॅनर्जी यांच्याबरोबर उपस्थित होते. मुख्य म्हणजे त्यांनी बॅनर्जी यांच्याशी थोडक्यात संवादही साधला. घोष यांनी मंदिराचे कौतुकही केले. परंतु, भाजपा या बाबतीत फार खूश नव्हती. घोष यांच्या या निर्णयावर टीका करणाऱ्या मजुमदार यांनी म्हटले की, पक्षाने मंदिर समारंभावर एकत्रितपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यावर घोष म्हणाले की, त्यांना मंदिरात जाण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही.