सोलापूर : माढा लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना लक्षवेधी ठरू पाहणाऱ्या माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांनी स्वतःच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव स्वतः निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले पुत्र रणजिसिंह शिंदे यांना वारसदार म्हणून जाहीर करीत आगामी माढा विधानसभा निवडणुकीत त्यांनाच संधी देण्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, त्यांच्या पुतण्यानेही मतदारसंघात दौरे वाढविल्याने शिंदे कुटुंबातच लढत होण्याची शक्यता वर्तविली जाते.

आमदार बबनराव शिंदे (वय ७२) हे १९९५ पासून आतापर्यंत सलग सहावेळा माढ्यातून विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. बडे साखर सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे अनुयायी म्हणून ओळखले गेलेले आमदार शिंदे हे नंतर थोड्याच काळात राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू झाले. इकडे राष्ट्रवादी पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व पत्करले आहे. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे हे त्यांचे बंधू आहेत. माढा तालुक्यात तत्कालीन युती सरकारच्या काळात अपक्ष आमदार असताना बबनराव शिंदे यांनी सिंचनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना माढ्यात आणल्या. त्यातून सुमारे ३५ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

आणखी वाचा-TISS Banned PSF: डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेवर TISS मुंबईने बंदी का आणली?

तथापि, अलीकडे माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते-पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडून आल्यानंतर आणि राज्यात महाविकास आघाडीचे वारे फिरू लागल्यानंतर राजकीय बदलत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या ताब्यातील सर्व जागा हिसकावून घेण्याचा चंग राष्ट्रवादी शरद पवार गटाने बांधला आहे. यात माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गट विशेषतः मोहिते-पाटील यांच्या निशाण्यावर असल्याचे बोलले जाते. माढा लोकसभा निवडणुकीत शिंदे बंधूंच्या माढा विधानसभा क्षेत्रातून ५२ हजार ५१५ तर करमाळ्यातून ४१ हजार ५११ एवढे मताधिक्य खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना मिळाले होते.

आणखी वाचा- ‘लाडकी बहीण’ योजनेतून दर वर्षी ४६ हजार कोटींची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

आमदार बबनराव शिंदे हे आगामी माढा विधानसभा निवडणूक स्वतः न लढविता आपले पुत्र रणजितसिंह शिंदे यांना संधी देणार असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यापासून सुरू होती. त्यावर स्वतः आमदार शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. प्रकृती साथ देत नसल्याने आमदार शिंदे यांनी युवकाला संधी म्हणून पुत्र रणजितसिंह यांना राजकीय वारसदार म्हणून घोषित केले आहे. रणजितसिंह शिंदे हे सोलापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष आहेत. ते स्वतः माढा मतदारसंघात संपर्क वाढवत आहेत.

दरम्यान, आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज रमेश शिंदे यांनीही मतदारसंघात गावभेट दौरे सुरू केले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याही भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे कुटुंबीयांमध्ये एकोपा राहणार की फूट पडणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे. यात शरद पवार आणि मोहिते-पाटील हे माढ्यात कोणता डाव टाकतात, याचीही सार्वत्रिक उत्सुकता आहे.