शिवसेना सोडून इतर पक्षात गेलेल्या आमदारांना पुढच्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. काहींचे तर राजकारणच संपुष्टात आल्याचा इतिहास विदर्भाचा आहे. त्यामुळे शिंदेसोबत गेलेल्या पाच आमदारांच्या राजकीय भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

१९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी सेनेत बंड केले होते. त्यावेळी भुजबळ यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडणाऱ्या १८ आमदारांमध्ये सहा विदर्भातील होते. त्यात डॉ. राजेंग्र गोडे (बुलढाणा), कृष्णराव इंगळे (जळगाव जामोद), दाळू गुरुजी (बोरगाव मंजू), डॉ. जगन्नाथ ढोणे (आकोट), प्रदीप वडनेरे (बडनेरा) आणि नामदेव दोनाडकर (ब्रम्हपुरी) यांचा समावेश होता. हे सर्व भुजबळ यांच्यासोबत काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कृष्णराव इंगळे यांचा अपवाद सोडला तर सर्व पराभूत झाले होते. विशेष म्हणजे डॉ. ढोणे यांना काँग्रेसने उमेदवारीच दिली नव्हती. १९९० मध्ये बडनेरामधून विजयी झालेले प्रदीप वडनेरे हा सेनेचा तरुण चेहरा होता. त्याच प्रमाणे बुलढाण्यातून जिंकलेले डॉ. राजेंद्र गोडे हा सेनेचा सुशिक्षित चेहरा होता. मात्र निवडणुकीतील पराभवामुळे यांचे त्यानंतरचे राजकारणच संपुष्टात आले. विशेष म्हणजे ब्रम्हपुरी वगळता सर्व जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या.

पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यांचे पालकत्व अस्थिर, ‘मविआ’शी ‘कड’वटपणा घेत तीन पालकमंत्री एकनाथ शिंदेच्या तंबूत दाखल

डॉ. गोडे यांना काँग्रेसने गृह राज्यमंत्री केले होते. मात्र सेनेच्या विजयराज शिंदे त्यांचा पराभव केला होता.राणेंनी बंड केले तेव्हाही त्यांच्यासोबत विदर्भातून विजय वडेट्टीवार (चिमूर) व प्रकाश भारसाकळे (दर्यापूर) हे दोन आमदार गेले होते. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवली होती व त्यात विजयी झाले होते. वडेट्टीवार व भारसाकळे यांची मतदारसंघावरील पकड मजबूत असल्यानेच त्यांना पक्षांतराचा फटका बसला नाही. पण भारसाकळे यांना नंतर काँग्रेससोडून भाजपमध्ये जावे लागले.

रामटेकचे सेनेचे तत्कालीन खासदार सुबोध मोहिते यांनाही पक्षातंराचा फटका बसला. त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर मोहिते यांनी अनेक पक्ष बदलले. सध्या ते राष्ट्रवादीत असले तरी राजकीयदृष्ट्या त्यांचा पूर्वी इतका प्रभाव नाही. आता शिंदेंसोबतही विदर्भातील तीन पक्षाचे व दोन पक्ष पुरस्कृत, असे पाच आमदार आहेत. बंडखोरांचा पूर्वइतिहास पराभवाचा असल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.