नाशिक: राष्ट्रवादीतील बंडखोर हे आता चिमण्या राहिलेल्या नाहीत. ते बलदंड झाले असून त्यांना या चिमण्यांनो परत फिरा, अशी साद घालण्याची स्थिती नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फुटीरांना टोले लगावले. याचवेळी कुणाला फेरविचार करायचा हरकत नसल्याची पुष्टीही जोडली. भाजपबरोबर सत्ता स्थापनेबाबत अनेकदा चर्चा झाल्या होत्या. राजकारणात हे होत असते. पण अखेर निर्णय महत्वाचा असून तसा निर्णय झाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
येवला येथील जाहीर सभेसाठी शनिवारी नाशिकमध्ये दाखल झालेले शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बंडखोरांना प्रत्युत्तर दिले. भाजपची देशात विरोधी पक्ष दुबळा करण्याची नीती असून राज्यातील घडामोडी त्याचाच भाग असल्याचे नमूद केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्या सभेसाठी नाशिकची निवड करण्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्य चळवळीपासून नाशिकचे महत्व असून पुरोगामी विचारांना मानणारा आणि साथ देणारा हा जिल्हा असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुंबईहून नाशिकला येताना सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि आत्मविश्वास दिसला, तो उत्साह वाढविणारा असल्याचे नमूद करुन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ना टायर्ड हूं, ना रिटायर्ड हूं या वाक्याचा दाखला देत त्यांनी चांगल्या प्रकृतीने चांगले काम करायला अडचण नसते, असे मांडत वयाचा आक्षेप खोडून काढला.




सुप्रिया सुळेंसाठी अजित दादांकडे दुर्लक्ष करण्यात आले, या प्रफुल पटेल यांच्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. भटक्या-विमुक्त चळवळीतून कामाची सुरुवात करणाऱ्या सुप्रिया यांची ही खासदारकीची तिसरी वेळ आहे. त्यांना आजवर सत्तेचे कोणतेही स्थान मिळालेले नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रात सत्तेत असताना सूर्यकांता पाटील आणि आगाथा संगमा यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. लोकसभेत पराभूत झाल्यानंतरही प्रफुल पटेल यांना राज्यसभेवर संधी दिली. केंद्रात ते १० वर्ष मंत्री होते.
निवड एकमताने
पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात माझी निवड एकमताने झाली असून तो प्रस्ताव पटेल यांनीच मांडला होता. या संदर्भातील अनेक पत्रे ही पटेल यांच्या स्वाक्षरीची आहेत. असे असतांना हा पक्ष नाही, अधिवेशनाला बेकायदेशीर म्हणण्यात कुठलाही अर्थ नसल्याचा टोला त्यांनी पटेल यांना हाणला.